केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने बॉलीवूडवरही शोककळा पसरली आहे.
गोपीनाथ मुंडे उत्तम मंत्री आणि सह्रदयी व्यक्तीमत्व असल्याच्या प्रतिक्रिया बॉलीवूडकरांनी दिली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेता रितेश देशमूख, विवेक ऑबरॉय, अनुपम खेर आणि इतर काही कलावंतांनी ट्विटरवरून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याने तीव्र दु:ख झाले आहे. ते केवळ उत्तम मंत्री नव्हते, तर चांगले व्यक्तीही होते. आमच्या कुटुंबाचीही मुंडे कुटुंबियांशीही जवळीक राहीली आहे. त्यामुळे या दु:खातून सावरण्याचे सामर्थ्य त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना असे लता मंगेशकर यांनी म्हटले आहे.
गीतकार जावेद अख्तर आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणाले की, “मुंडे यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. मुंडे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे.”
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही मुंडे यांना श्रद्धांजली दिली असून ते एक चांगले मित्र आणि हितचिंतक असल्याचे त्या म्हणाल्या.
तर अभिनेता रितेश देशमुखने आपल्या वडीलांसह प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे एकत्रित छायाचित्र ट्विटरवर शेअर करुन मुंडेजी राजकीय व्यक्तीमत्वाखेरीज माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. त्यांचे जाणे तीव्र दु:ख देणारे ठरले असल्याचे म्हटले आहे.
गोपीनाथजी नेहमी मदतीला तयार असत त्यांचे जाणे मन हेलावणारे ठरल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिली आहे. तसेच भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही मुंडे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा