Sanjay Dutt Biopic Sanju. सध्याच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीत कोणत्या विषयाची चर्चा सुरु आहे, असं विचारलं असता अनेकजण ‘संजू’ या चित्रपटाचं नाव घेतात. अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर भाष्य करणारा हा चित्रपट अवघ्या काही दिवसांनीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा या चित्रपटातून संजूबाबाविषयी माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. पण, तुम्हाला माहितीये का, एक अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या याच संजय दत्तने आयुष्याच्या एका वळणावर या कलाविश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. खुद्द संजूबाबानेच याविषयीचा खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत संजयने ही गोष्ट सांगितली होती. अमेरिकेत अमली पदार्थांच्या व्यसनावर आळा घालण्यासाठी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात असतेवेळीच आपल्या मनात या कलाविश्वापासून दूर जाण्याचा विचार आला होता, असं संजय म्हणाला होता. रिहॅब सेंटरमध्येच बिल नावाच्या एका व्यक्तीशी त्याची ओळख झाली होती. जो बीफ विक्रीच्या व्यवसायात होता. त्याच्यासोबतच हातमिळवणी करुन अमेरिकेत बीफ विक्रीच्याच व्यवसायात उडी घेण्याचा संजय दत्तनेही विचार केला होता.

इतकच नव्हे तर व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याने वडिलांना म्हणजेच सुनील दत्त यांना आपल्या खात्यात असणारे थोडेथो़डके पैसे पाठवण्यास सांगितलं होतं. पण, वडिलांच्या आग्रहाखातर त्याला भारतात परत यावं लागलं. त्याचवेळी एका वर्षाच्या आत परत अमेरिकेला जायचं हा विचारही संजूबाबाच्या मनात होता. पण, अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर पप्पू वर्माने ‘जान की बाजी’ या चित्रपटासाठी त्याची निवड केली. ज्यामुळे पुढे संजयचं अमेरिकेत जाणं टळलं आणि त्याच्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या याच चढउतारांच्या आधारावर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’चं कथानक आकारास आणलं आहे. नात्यांच्या परिभाषा, आयुष्यात आपल्याकडून झालेल्या चुका आणि त्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा इतरांचा बदललेला दृष्टीकोन या सर्व गोष्टींवर ‘संजू’मधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. २९ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood movie actor sanjay dutt biopic sanju leave film industry and start beef business in america