विनोदवीर कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून आहे. त्याने या अपेक्षा ठेवणं स्वाभाविक आहे. कारण, पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर कपिलने खचून न जाता त्याच्या अभिनय कौशल्यावर बरीच मेहनत घेत ‘फिरंगी’ची तयारी केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधून कपिलच्या अभिनय कौशल्याची झलक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं ‘ओय फिरंगी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. त्यामागामोग आता ‘फिरंगी’तील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून कपिल शर्मा आणि इशिता दत्ता या जोडीचं सुरेख समीकरण पाहायला मिळत आहे.

‘सजना सोने जिहा’ असे बोल असणारं हे गाणं डॉ. देवेंद्र काफीर यांनी लिहिलं असून, ज्योती नूरां हिने ते गायलं आहे. जतिंदर शाहने अस्सल पंजाबी अंदाजात हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. जुन्या काळात प्रेमाची व्याख्या नेमकी कशी होती याची सुरेख झलक या गाण्यातून पाहायला मिळते. प्रियकराला पाहून एखादी मुलगी कशा प्रकारे लाजते, तिच्या चेहऱ्यावर नेमके कोणते भाव असतात याचे चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

पंजाबी संस्कृती आणि स्वतंत्र्यपूर्व काळाची सांगड घालण्यात आलेल्या या गाण्यातून कपिलचा अभिनयही अनेकांची मनं जिंकत आहे. ‘फिरंगी’ या चित्रपटातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानकावर भाष्य करण्यात येणार आहे. ब्रिटींशांच्या सेवेत रुजू असणाऱ्या खेडेगावातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्याभोवती या चित्रपटाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मोनिका गिल, कुमुद कुमार मिश्रा, राजेश शर्मा हे कलाकारही झळकणार आहेत.