संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे झालेला वाद पाहून या चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ असे करण्यात आले. चित्रपटाच्या नावात बदल केल्यानंतर लगेचच त्यात आणखी ३०० बदल सुचवले असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, तसे काहीच नसून या चित्रपटात सेन्सॉरने सुचवल्यानुसार चित्रपटात फक्त पाच बदल करण्यात आले असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले.

सेन्सॉरच्या भूमिकेविषयी ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी समाधान व्यक्त केल्याचे वृत्त ‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केले आहे. चित्रपटात काही महत्त्वाचे बदल करत अगदी त्याचे नावही बदलण्यास भन्साळींची टीम तयार झाली खरी. पण, चित्रपटाच्या नावातील एक अक्षर वगळले असले तरीही त्यांनी यात नव्याने एका अक्षराची जोड दिल्याचे कळत आहे. ‘पद्मावत’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक नजर टाकल्यास ही महत्त्वाची गोष्ट लक्षात येतेय. या अकाऊंट हँडलच्या नावात ‘पद्मावत’मध्ये आणखी एक ‘ए’ हे अक्षर जोडण्यात आले आहे. ज्योतिषांच्या सल्ल्याने आणखी एक अक्षर जोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

ट्विटर हॅँडलवर करण्यात आलेल्या या बदलाने सध्या अनेकांचेच लक्ष वेधले असून चित्रपटाच्या नावाविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. जास्तीचे एक अक्षर जोडले गेले तरीही त्या शब्दाचा उच्चार पूर्वीप्रमाणेच होणार आहे हे मात्र खरे. गेल्या काही महिन्यांपासून ‘पद्मावत’च्या मुद्द्यावरुन सुरु असणाऱ्या या वादाला दर दिवशी एक वेगळे वळण मिळत आहे. त्यामुळे चित्रपटावर असणारे संकटांचे सावट काही केल्या कमी होत नाही असेच अनेकांचे म्हणणे आहे. या सर्व चर्चा आणि गोंधळाची परिस्थिती पाहता आता ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यानंतरच या चित्रपटात करण्यात आलेले बदल आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

Story img Loader