दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटात प्रेम, विरह अथवा काही गैरसमजातून अथवा अन्य कारणास्तव प्रेयसी दुरावल्याने व्यथित झालेल्या प्रियकराचे उदास गाणे ही हुकमी सिच्युएशन. हे गाणंदेखील अगदी तसेच, किशोरकुमारच्या गंभीर आवाजात अधिकच भावस्पर्शी ठरलेले,
दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बरबादी की तरफ ऐसा मोड़ा
एक भले मानुष को, अमानुष बना के छोड़ा
शक्ती सामंता निर्मित आणि दिग्दर्शित ‘अमानुष’ (१९७५) मधील हे गाणं याच प्रकारातील नायक (उत्तमकुमार) नायिका (शर्मिला टागोर) गैरसमजातून दुरावल्याने विलक्षण दुखावलाय म्हणून गातोय. या दोघांत असे अंतर पडण्यात त्यांच्या गावात घडलेल्या काही घटनाही कारणीभूत आहेत.
सागर कितना मेरे पास है, मेरे जीवन में फिर भी प्यास है
है प्यास बड़ी जीवन थोड़ा, अमानुष बना के छोड़ा
कहते हैं ये दुनिया के रास्ते, कोई मंज़िल नहीं तेरे वास्ते
नाकामियों से नाता मेरा जोड़ा, अमानुष बना के छोड़ा
गावातील नदीतून चाललेल्या छोट्या लाँचमध्ये उत्तमकुमार अतिशय व्यथितपणे गातोय, आणि त्याच लाँचमधून प्रवास करणारी शर्मिला टागोर त्याच्या भावना ऐकून काहीशी अस्वस्थ होतेय. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि बंगाली अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. पश्चिम बंगालमधील गावात हा चित्रपट घडतो. उत्तमकुमार बंगाली चित्रपटातील दिलीपकुमार म्हणून ओळखला जाई.
डूबा सूरज फिर से निकले, रहता नहीं है अंधेरा
मेरा सूरज ऐसा रूठा, देखा न मैने सवेरा
उजालों ने साथ मेरा छोड़ा, अमानुष बना के छोड़ा
इंदिवर यांच्या गीताला श्यामल मित्रा या बंगाली संगीतकाराचे संगीत असा हा वेगळाच योग दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी आणला. संपूर्ण गाण्यात त्यानी उत्तमकुमारची शर्मिला टागोरकडे पाठ आहे असं दाखवतानाच तिला त्याची वेदना ऐकून त्याच्याकडे यावेसे वाटते हा फिल कायम ठेवला आणि त्याच वेळेस दिवस सूर्यास्ताच्या दिशेने चाललाय, हेही गाण्यात समाविष्ट केलेय.
किशोरकुमारची अशी प्रेमभंग झालेल्या प्रसंगावर गाणी अनेक. त्यात हे चित्रपटाच्या थीमच्याही ओघाने जाणारे. ‘येथे दिग्दर्शक दिसतो’ असे म्हटले तर ते योग्यच ठरेल. उत्तमकुमारने गाण्याचा आणि प्रसंगाचा मूड नेमका पकडून आपले रुपडे ठेवलेय. शर्मिला टागोरने अंगावर शाल घेत लाँचमधील प्रवासाचा मूड नेमका पकडलाय. गाणे सर्वार्थाने साकारणे असे गरजेचे असते, तरच ते इतक्या वर्षांनंतरही तेवढेच प्रभावी ठरते. किशोरकुमारच्या आवाजातील दर्द या गाण्यातील अतिशय वेधक गोष्ट आहे, म्हणूनच त्याच्या चाहत्यांचे हे आवडत्या गाण्यांपैकी एक.