दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटातून अगदी कृष्ण-धवल अर्थात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ काळापासून खूपच मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत आलाय आणि त्यात चिंब होत नायक-नायिकेनी साकारलेली प्रेम गीते केवढी तरी. काही जणू पडद्यालाही भिजवून टाकतील की काय अशी तर काही गाण्यात प्रचंड ओले होतानाच नकळत काही गोष्टीही सांगणारे. हेदेखील असेच.
डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा
बिन पिये मैं तो गिरा, मैं तो गिरा, मैं तो गिरा, हाए अल्ला
सूरत आप की सुभान अल्ला
मुसळधार पावसात राज कपूर कमालीच्या मोकळेपणाने, मनसोक्त आनंद घेत आणि देत गातोय. मुकेशचे पार्श्वगायन व राज कपूरचा अभिनय हे अगदी हिट काँबिनेशन. हे गाणे तर गायन व अभिनय या दोन्हीत मुक्तछंदाला भरपूर वाव देणारे म्हणून तर जास्तच खुललय. ‘छलियाँ’ (१९६०) या चित्रपटातील हे गाणे असून दिग्दर्शक मनमोहन देसाईचा हा पहिला चित्रपट होय.
तेरी अदा वाह वाह क्या बात है
अँखियाँ झुकी झुकी, बातें रुकी रुकी
देखो कोई रे आज लूट गया, हाए अल्ला…
एका वस्तीमधून छत्री घेऊन भर पावसात राज कपूर छान गात गात चाललाय. आजूबाजूनेही बरेच जण चालताहेत. अशातच एक युवती भेटते, तिला उद्देशून तो गातो, मग ट्रॅफिक पोलीस भेटतो. राज कपूर प्रेमदृश्यात माहीर तसाच तो सामाजिक भान ठेवून वावरण्यातही हुशार. या गाण्यात त्याच्या या दुसर्या गुणाचा छान प्रत्यय येतो.
सनम हम माना गरीब है
नसीबा खोटा सही, बंदा छोटा सही
दिल ये खज़ाना है प्यार का, हाए अल्ला…
कालांतराने बडबड गीत म्हणून काही गाणी ओळखली जाऊ लागली. त्यात हे एकदम फिट्ट. पण कोसळणाऱ्या पावसाचा वेग गायन-संगीत-अभिनय अशा तीनहीमध्ये साधला गेलाय हे विशेषच. जुन्या चित्रपट गीत-संगीताची ही खासियतच. एकाच गाण्यात अनेक गोष्टी जुळवून आणले जाई.
तेरी कसम तू मेरी जान है
मुखड़ा भोलाभाला, छूपके डाका डाला
जाने तू कैसी मेहमान है, हाए अल्ला …
राज कपूर छत्री उडवून देऊन आता यथेच्छ पावसात भिजू लागतो. एव्हाना हे गाणे आपणही गुणगुणू लागतो. आपल्यालाही वाटते, आपणही राज कपूरप्रमाणेच भर पावसात जाऊन चिंब व्हावे, सगळी सुख- दुःखे विसरुन जावीत. राज कपूरच्या जागी आपण आता स्वतःलाच पाहू लागतो. गीतकार कमर जलालाबादी आणि संगीतकार कल्याणजी- आनंदजी यानी या पाऊस गाण्यात बरेच काही साध्य केलेय हे एव्हाना तुमच्याही लक्षात आले असेलच…