दिलीप ठाकूर
हिंदी चित्रपटामधील प्रेम त्रिकोणातील एक हुकमी प्रसंग म्हणजे, त्यातील एक प्रेमिक नेमका नायिकेचे दुसऱ्या नायकाशी लग्न होणार आहे अशा घोषणेच्या ऐन बैठकीत कमालीचे भावपूर्ण गाणे गाऊन आपले त्या नायिकेवरचे प्रेम व्यक्त करतो. त्याला हा भावनिक धक्काच असल्याने त्याच्या गायकीतून ती जखम भळाभळा वाहू लागते, म्हणूनच नायिकेचा अश्रूंचा बांध फुटतो तर तिच्याशी लग्न ठरलेला नायक या सार्‍यातून काय ते समजून जातो.

सवेरे का सूरज तुम्हारे लिये है
के बुझते दिये को ना तुम याद करना
हुये एक बीती हुई बात हम तो
कोई आँसू हम पर ना बरबाद करना

राम मुखर्जी दिग्दर्शित ‘एक बार मुस्कुरा दो’ ( १९७२) या अगदी नावापासूनच हा प्रेम त्रिकोण गोष्टीवरचा आहे हे स्पष्ट होणार्‍या चित्रपटात हा असाच प्रसंग आहे . (दिग्दर्शक राम मुखर्जी म्हणजे राणी मुखर्जीचे पिता होत.) चित्रपटात तनुजाचे लग्न जाॅय मुखर्जीशी ठरते आणि हे समजताच देब मुखर्जी अतिशय दुःखी भावनेने गाऊ लागतो, तनुजाला हे ऐकून हुंदके फुटतात, आणि हे पाहून जाॅय मुखर्जी काय ते समजून जातो. इफ्तिखारलाही या नाजूक परिस्थितीचा अंदाज येतो. पण आजूबाजूला असणारे ज्युनियर आर्टिस्ट मात्र इतक्या अप्रतिम दर्दभरे गीतावर अगदीच कोरडे भाव व्यक्त करताना दिसतात हे विसरुनच हे गाणे पहावे.

तुम्हारे लिये हम, तुम्हारे दिये हम
लगन की अगन में अभी तक जले हैं
हमारी कमी तुम को महसूस क्यों हो
सुहानी सुबह हम तुम्हें दे चले हैं
जो हर दम तुम्हारी खुशी चाहते हैं
उदास होके उनको ना नाशाद करना

गीतकार इंदिवर यांची अशी विव्हळत भावना व्यक्त करणारी गाणी एक वैशिष्ट्य होते. संगीतकार ओ. पी. नय्यरचे हे वेगळेच गाणे ठरावे. किशोरकुमारच्या ओथंबून दर्द व्यक्त करणाऱ्या गाण्यातील हे एक आहेच.

सभी वक़्त के आगे झुकते रहे हैं
किसी के लिये वक़्त झुकता नही है
बड़ी तेज़ रफ़्तार है जिदगी की
किसी के लिये कोई रुकता नहीं है
चमन से जो एक फूल बिछड़ा तो क्या है
नये गुल से गुलशन तो आबाद करना

प्रेमभंग झालेला प्रेमिक जसा व्यक्त व्हायला हवा ते या गाण्यात असतानाच काही तत्वज्ञानदेखिल मांडण्याचा प्रयत्न झाल्याने हे गाणे जास्तच प्रभावी आणि प्रवाही झालंय. ती उंची देब मुखर्जीला अभिनयातून गाठता आली नसली तरी किशोरकुमार मात्र तन्मयतेने गायलाय.

चराग अपनी धरती का बुझता है जब भी
सितारे तो अंबर के रोते नही हैं
कोई नाव तूफान में जब डूबती है
किनारे तो सागर के रोते नही हैं
हैं हम डोलती नाव डूबे तो क्या है
किनारे हो तुम, तुम ना फरियाद करना

अगदी शेवटी उच्च स्वरात व वेगात भावना व्यक्त होतात. कोणत्याही प्रेमिकाची अशा प्रसंगी जी व जशी भावना होईल तो मूड यामध्ये उत्तम पकडलाय. हे गाणे पहावेसे वाटेलच असे नाही. पण ऐकून प्रचंड दाद देऊ शकता.