दिलीप ठाकूर
चित्रपटात गाणे पटकथेत अशा ठिकाणी हवे की, एक तर ते त्या गोष्टीला पुढे घेऊन जाणारे हवे अथवा तो क्षण त्याच गोष्टीतील उत्कंठा वाढवणारा हवा. (गाणे सुरु होताच प्रेक्षक चहा, सिगारेट, लघुशंका यासाठी बाहेर पडणारा नसावा.) अर्थात हे कसलेल्या दिग्दर्शकाचे काम आहे. हे गाणेदेखील असेच. ते संपताच काय बरे होईल याची विलक्षण उत्कंठा निर्माण करणारे.
चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ हम दोनों
पती (अशोककुमार), पत्नी (माला सिन्हा) आणि तिचा माजी प्रियकर (सुनील दत्त) अशी या गाण्यातील पात्ररचना आहे. ज्यांनी ‘गुमराह’ (१९६३) पाहिलाय त्यांना या प्रसंगातील पेच माहित्येय. हे लग्न केवळ नाईलाजाने होते. बहिणीचा अपघातात मृत्यू होतो म्हणून तिच्या नायिकेला प्रियकराची साथ सोडून मेव्हण्याशी लग्न करावे लागते. यामुळे दुरावलेला आणि दुखावलेला प्रियकर तिला काही वर्षांनी यशस्वी गायक म्हणून भेटतो. आपल्या पतीला हे माहित होऊ नये म्हणून ती खूप काळजी घेते, पण पती नेमका त्यालाच घरी पाहुणा म्हणून बोलावतो.
न मैं तुम से कोई उम्मीद रखूँ दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ देखो ग़लत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों में
न ज़ाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज़ नज़रों से
गीतकार साहिरने हा अवघड प्रसंग गाण्यात नेमका पकडलाय. संगीतकार रवी यांनी पियानोचा वापर करून हाच मूड आणखी खुलवलाय (संपूर्ण गाणे सुनील दत्त पियानोवर साकारतो) आणि महेन्द्र कपूरने भावनांचे चढउतार तसेच आवाजात चढउतार करीत साकारलयं. निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांची ही गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायक यांची हुकमी टीम. अनेक चित्रपटांमधून एकत्र काम करत त्यांचा सूर अशा अनेक गाण्यात जुळलाय.
तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशक़दमी से
मुझे भी लोग कहते हैं की ये जलवे पराये हैं
मेरे हमराह भी रुसवाईयाँ हैं मेरे माज़ी की
तुम्हारे साथ अभी गुज़री हुई रातों के साये हैं
अशोककुमार पाईप ओढत ओढत छद्मी हास्य करत, कधी माला सिन्हावर नजर टाकत या गाण्याचा आनंद घेतोय, तर सुनील दत्त या गाण्यातून जे आपल्याला सांगतोय ते आपल्या पतीला अर्थात अशोककुमारला लक्षात येईल की काय या भीतीने माला सिन्हा अस्वस्थ आहे. गाण्यात नातेसंबंधांवर भाष्यही आहे.
तआरुफ़ रोग हो जाए तो उसको भूलना बेहतर
तअल्लुक़ बोझ बन जाए तो उसको तोड़ना अच्छा
वो अफ़साना जिसे अन्जाम तक लाना न हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा
हे गाणे ऐकतानच चित्रपटातील हा प्रसंग डोळ्यासमोर येतोच. पटकथेतील उत्कंठा वाढवणारे हे गाणे आहे. साहिरचे गाणे असल्याने त्यात काव्यही आहेच.