या गाण्याचा मुखडा ऐकताच दिलफेक अथवा दिलेर शशी कपूर नक्कीच डोळ्यासमोर आला असणार. ही कपूर मंडळी रुपेरी पडद्यावर प्रेमात तसं खूपच सहज व लवकर पडतात. विशेष म्हणजे त्यावेळी कॅमेराही त्यांच्यावर जरा जास्तच मोकळेपणाने प्रेम करताना जाणवतो….
खिलते हैं गुल यहाँ
खिलके बिखरने को
मिलते हैं दिल यहाँ
मिलते बिछडने को…..
शशी कपूर खरं तर थेट राखीलाच उद्देशून गातोय पण, ती तर आपल्या दहा बारा मैत्रिणींसोबत थंड हवेच्या ठिकाणी सहलीला आलीय. बाहेर मोठ्या प्रमाणात बर्फ पडतोय म्हणून हे सगळेच एका खोलीत बसलेत. त्यातच शशी कपूरचं प्रेम जागं झालं आहे. घारे डोळे, गोबरे गाल यामुळे राखीचं व्यक्तिमत्व अधिकच खुललं..
कल रहे ना रहे
मौसम ये प्यार का
कल रुके ना रूके
डोला बहार का…
राखी गुलाबाचे फूल हाती घेऊन शशी कपूरच्या प्रेमाची हाक ओळखतेय. तिच्या मैत्रीणी गरम चहाचा आस्वाद घेत थंडी थोपवायचा प्रयत्न करतानाच प्रेमाच्या या लपंडावाचाही आनंद घेत आहेत. अचानक उघडलेली खिडकी शशी कपूर गात गात बंद करतो. पण, त्यातून आलेल्या बर्फाच्या तुकड्याने या मैत्रीणी एकमेकींची छेडछाड सुरु करतात. थंडी वाढल्याने शशी कपूर शेकोटी वाढवतो. एकाच वेळेस किती गोष्टी घडतात बघा.
फूलों के सीने में
ठंडी ठंडी आग है…
किशोरकुमार अशा मुक्तछंदाच्या गाण्यात प्रत्येक बारकाव्याला खुलवतोच. ‘शर्मिली’ (१९७१) या चित्रपटातील सगळीच गाणी सुरेल, त्यामुळेच ती प्रचंड गाजलीही. नीरज यांच्या गीताना सचिन देव बर्मन यांचे संगीत होते. सगळेच सूर अगदी जमून आले. सुबोध मुखर्जी साठ सत्तरच्या दशकातील मोठे निर्माते. ‘शर्मिली’ हा त्यांचा आणखीन एक सुपरहिट चित्रपट. समीर गांगुली दिग्दर्शित या चित्रपटात राखी दुहेरी भूमिकेत होती.
प्यासा है दिल सनम
प्यासी यह रात है…
गाणे शेवटाकडे येते … शशी कपूर राखीवर प्रभाव पाडण्यात, तिचं मन जिंकण्यात यशस्वी ठरलेला असतो. ती देखील त्याचे रुपडे आणि प्रेम व्यक्त करण्याची पद्धत यांमुळे त्याच्यावर खुश असते. ती कटाक्षाने बरेच काही सुचित करते.
खिलते है गुल यहा…
हे गाणे चित्रपटात दोन वेळा आले आहे. पण, दुसऱ्या वेळचा प्रसंग खूपच वेगळा आहे. जायबंदी शशी कपूर इस्पितळात दाखल झाला असतानाच त्याला हे सूर ऐकू येतात. रात्रीची वेळ आहे व राखी ते गात गात चाललीय. लता मंगेशकर यांचा सूर थोडा गंभीर आहे. असो. पण हे गाणे आठवताच शशी कपूरने उत्साहात साकारलेले गाणे पटकन आठवते. आणि राखीची बोलकी नजरही डोळ्यासमोर येते.