कुठल्याही क्षेत्रात जुनी पिढी एकदम झर्रकन बाहेर जात नाही. तशीच नवी पिढीही एका फटक्यात स्थिरावत नाही. हे तथ्य बॉलीवूडला समजले आहे. त्यामुळे सरत्या वर्षांत नव्या-जुन्या कलाकारांच्या चित्रपटांची ‘मिक्स बॅग’ प्रेक्षकांना  अनुभवता आली.
नवोदित कलाकारांना मुख्य भूमिकांमधून खेळवण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश निर्मात्यांचा डाव या वर्षी चांगलाच यशस्वी झाला आहे. त्यामुळे एकीकडे अर्जुन कपूर (औरंगजेब), आदित्य रॉक कपूर-श्रद्धा कपूर (आशिकी २), रणवीर सिंग (लुटेरा, गोलियों की रासलीला राम-लीला), वरूण धवन-सिद्धार्थ मल्होत्रा-आलिया भट (स्टुडण्ट ऑफ द इयर), परिणीती चोप्रा (शुद्ध देसी रोमान्स), सुशांत सिंग राजपूत (काय-पो-छे) अशा नव्या चेहऱ्यांनी यावर्षी मोठय़ा पडद्यावर आपले अस्तित्व निर्माण केले. आगामी वर्षांत हेच चेहरे वेगवेगळ्या चित्रपटांमधून आपले वर्चस्व गाजवताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे मोठय़ा कलावंतांच्या सीक्वेल आणि रिमेकनी यश-अपयश दोन्हींची चव चाखली. ‘रेस २’, ‘ग्रॅण्ड मस्ती’ या सीक्वेल्सबरोबरच ‘क्रिश थ्री’, ‘धूम थ्री’ या दोन चित्रपटांच्या सीक्वेल्सनी विक्रमी कमाई केली. त्यामुळे आमिर खान आणि हृतिक रोशन या दोघांनाही १००-२०० कोटींची रस्सीखेच पुढच्या वर्षीपर्यंत नेण्यात यश आले आहे. रिमेकबद्दल बोलायचे झाले तर ‘चष्मेबद्दूर’ आणि ‘आशिकी २’ या चित्रपटांमध्ये नवे चेहरे असूनही त्यांना चांगले यश मिळाले. मात्र या वर्षीचा मोठा रिमेक मानला गेलेला ‘जंजीर’ सपशेल आपटला. ‘जंजीर’च्या अपयशामागे अमिताभ बच्चन यांच्या जागी रामचरण तेजा या दाक्षिणात्य अभिनेत्याची निवड बहुधा प्रेक्षकांना फारशी रुचली नसावी. मात्र त्याचवेळी धनुष या दाक्षिणात्य अभिनेत्याने ‘रांझना’सारखा तुलनेने अनवट वाटेवरचा चित्रपट असूनही १०० कोटींचा व्यवसाय करत बॉलिवूडमध्ये शिरकाव केला.  शाहरूख खानला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कुठल्याही सीक्वेल्स आणि रिमेकच्या प्रेमात न पडता दिग्दर्शक रोहित शेट्टीचा हात धरून ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारखा विनोदी चित्रपट करावा लागला.  या वर्षी नवीन विषयांवरील विशेषत: तरुणांना आकर्षित करतील अशा चित्रपटांना यश मिळाले. ‘ये जवानी है दिवानी’, ‘एक थी डायन’, ‘मद्रास कॅफे’, ‘लुटेरा’, ‘शिप ऑफ थिसस’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ याचबरोबर मराठीतही ‘बीपी’, ‘दुनियादारी’ सारख्या चित्रपटांना कोटींचा व्यवसाय करता आला.

Story img Loader