सिनेमा- फिल्लौरी
कलाकार- अनुष्का शर्मा, दिलजित दोसांज, सुरज शर्मा, मेहरीन पीरझादा
दिग्दर्शक- अन्शै लाल
‘फिल्लौरी’मध्ये अनुष्का शर्मा भूत बनलीये. हिंदी सिनेमातल्या भुतांची नेहमीच थट्टा उडवण्यात आली आहे. त्यामुळे हा सिनेमा म्हणजे पोरखेळ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. त्यातही ‘फिल्लौरी’मध्ये चक्क अनुष्काने भूत बनण्याचे धाडस केले. नुसते धाडस नाही तर सिनेमाच्या प्रमोशनमध्येही तिने भुताला प्राधान्य दिले. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अनुष्काचा ‘फिल्लौरी’ शुक्रवारी प्रदर्शित झाला.
सिनेमाची सुरुवातीला कनन (सुरज शर्मा) आणि अनुचे (मेहरीन पीरजादा) लग्न होणार असते. पण कनन स्वतःच्या लग्नाबाबत फारसा आनंदी नसतो. त्याला मंगळ आहे म्हणून जबरदस्ती एका झाडाशी लग्न करायला सांगतात. त्या झाडावर शशीचं (अनुष्का शर्मा) भूत असतं. कननने त्या झाडाशी लग्न केल्यामुळे शशीही त्याच्यासोबत २४ तास असते. आधीच लग्न करायचे की नाही या मानसिक गोंधळात असलेल्या कननला त्याने एका भूताशी लग्न केले हे काही पचनी पडत नाही. सिनेमात संगीत, कविता, स्वातंत्र्यपूर्व काळ, प्रेम, समाज या सगळ्याची बांधणी उत्तमरित्या करण्यात आली आहे.
इम्तियाझ अलीचा ‘लव्ह आज कल’ आठवतोय का? ‘लव्ह आज कल’मध्ये ज्यापद्धतीने भूतकाळ आणि वर्तमान एकाचवेळी दाखवण्यात आले आहेत त्याचपद्धतीने या सिनेमाच्या पूर्वाधात दाखवण्यात आले आहे. भूतकाळातली दिलजित आणि शशीची प्रेम कहाणी तर प्रत्यक्षात कननची उडालेली भंबेरी यामुळे सिनेमाचा पूर्वार्ध खिळवून ठेवतो. ‘उडता पंजाब’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या दिलजित दोसांजवरुन नजर हटत नाही. सूरज शर्मानेही भूमिकेला साजेसा असा अभिनय केला आहे. कलाकारांच्या निवडीसाठी फार विचार करण्यात आल्याचे प्रकर्षाने जाणवते. गोंधळलेल्या मुलाची भूमिका सूरजने चपखलपणे निभावली आहे. तर मेहरिनने त्याला उत्तम साथ दिली आहे.
सिनेमातली गाणी ही या सिनेमाची जमेची बाजू. प्रत्येक गाणं हे त्या त्या प्रसंगाला चपखल बसतं. व्हिएफक्स ही सिनेमाची अजून एक जमेची बाजू. सिनेमाचा उत्तरार्ध थोडा लांबलेला वाटतो त्यामुळे शेवटी शेवटी कंटाळा येऊ शकतो. अन्शै लालने या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले असून, एक दिग्दर्शक म्हणून त्याने ही भूमिका चांगली निभावली असे म्हणावे लागेल. अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात अशा वेगळ्या धाटणीचा विषय हाताळण्यात आला. अनुष्का शर्मा एक पंजाबी मुलगी म्हणून जेवढी सहजपणे वावरताना दिसते तेवढीच सहजता ती भूत बनल्यानंतरही दिसते. एक निर्माती म्हणून एनएच १० नंतरचा अनुष्काचा हा दुसरा सिनेमा आहे. तिने निर्मितीसाठी या सिनेमाची निवड का केली असेल हे सिनेमा पाहताना नक्कीच कळून येते.
पण फिल्लौरी आणि शशीच्या प्रेमाचे काय झाले? शशीचा आत्मा नेमका कशासाठी भटकत आहे? त्यावेळी नेमके काय घडले होते? अशा प्रश्नांची उत्तरं देत हा या सिनेमाचे कथानक उलगडत जाते. सिनेमातील संवाद मनाला भिडणारे नसले तरी काही संवाद मात्र दीर्घकाळासाठी लक्षात राहतात. त्यापैकी एक म्हणजे डरोगे तो पछताओगे… या सिनेमाबाबतीतही नेमके असेच आहे. भूताची ही अनोखी कथा एकदा तरी पाहाच त्यातूनच ‘हमेशा साथ रेहना…’ म्हणजे काय ते नक्की कळेल.
– मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com