बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हृदेश सिंग म्हणजेच हनी सिंगची पत्नी शालिनी तलावरने सिंग कुटुंबावर घरगुती हिंसाचार, मानसिक शोषण आणि आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणामध्ये आज हनी सिंग नवी दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयामध्ये उपस्थित होता. हनी सिंग कोर्टामध्ये पोहचला तेव्हा त्याच्या अवतीभोवती सुरक्षारक्षकांचं कवच होतं. न्यायाधिशांनी या प्रकरणाची सुनावणी ओपन कोर्टात न करत आपल्या दालनामध्ये केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. आझ या सुनावणीदरम्यान हनी सिंगने तीस हजारी कोर्टाला आपल्या कमाईसंदर्भातील सर्व तपशील एका बंद लिफाफ्यामधून सादर केला.
महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी आपल्या दालनामध्ये हनी सिंग आणि त्यांची पत्नी शालीनी तलवार यांचं समुपदेशन केलं. त्यांनी जवळजवळ एक तास या दोघांशी चर्चा करुन त्यांच्यामधील वाद समजून घेण्याचा आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला. याचिकाकर्त्या महिलेने आपलं सासर सोडताना काय घडलं याबद्दल मतभेद असल्याचं निरिक्षण न्यायाधिशांनी नोंदवलं. शालिनीने आपल्याला घरातून हकलून देण्यात आल्याचा दावा केला तर हनी सिंगने शालिनी स्वत:च्या इच्छेने १६ मार्चला घराबाहेर पडल्याचं सांगितलं. न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार हनी सिंगच्या पत्नीने २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई पतीकडून मागितली आहे. तर तात्पुरती मदत म्हणून १० कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी शालिनीने याचिकेमध्ये केलीय.
नक्की पाहा >.> “हनिमूनच्या वेळेस त्याने मला बेडवर ढकललं आणि…”; हनी सिंगच्या पत्नीने दाखल केलेल्या १६० पानी याचिकेत ‘त्या’ प्रसंगाचाही उल्लेख
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार आपल्या इच्छेनुसार आपलं सामान घेऊन जाऊ शकते. ती आपलं सामान घेऊन जाताना व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे. रविवारी सकाळी ११ वाजता शालिनीने हनीसोबत ती राहत होती त्या घरी जाऊन आपलं सामान घ्यावं असं सांगण्यात आलंय. पत्नीने १० दिवसांमध्ये तिचं इनकम सर्टिफिकेट न्यायालयासमोर सादर करावं असं म्हटलं आहे. न्यायालयाने, “आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही पक्षांमध्ये यापुढे काहीच वाद होणार नाही. असं झालं तर या सर्वाची न्यायालय कठोर दखल घेईल,” असा इशारा दिलाय.
मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नोटीस जारी करुन हनी सिंगला न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र तो न्यायालयामध्ये आला नव्हता. त्यावर महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांनी नाराजी व्यक्त करताना न्यायालयाच्या आदेशाचंही पालन केलं जात नाही हे आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं होतं. कायद्याहून श्रेष्ठ कोणीच नाहीय हे आरोपीने लक्षात ठेवायला हवं अशा शब्दात दंडाधिकाऱ्यांनी हनी सिंगला सुनावलं होतं. शालिनी तलवार मात्र न्यायालयामध्ये उपस्थित होत्या. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. माझा नवरा माझ्यावर अत्याचार करतो, माझं मानसिक आणि आर्थिक शोषण करतो असं शालिनीने तक्रारीत म्हटलं आहे. हनी सिंगच्या आई वडीलांनी आणि छोट्या बहिणीनेही आपल्यावर अत्याचार केल्याचं शालिनीने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याचे पालक आणि बहिणीविरोधात १६० पानांची याचिका दाखल केलीय.
१० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १४ मार्च २०१० रोजी हनी आणि शालिनीने घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. त्यानंतर २३ जानेवारी २०११ रोजी सरोजनी नगरमधील गुरुद्वारामध्ये लग्न केलं होतं. हनी सिंगला लोकप्रियता मिळण्याच्या आधीपासूनच संगीत क्षेत्राची आवड होती. शालिनीनेही त्याला अगदी सुरुवातीच्या काळापासूनच त्याची ही आवड जोपसण्यासाठी मदत केली होती. लग्न झालेलं असतानाही हनी सिंगला आपल्या लग्नासंदर्भात जगाला कळावं असं वाटत नसल्याचंही शालिनीने याचिकेत म्हटलं आहे. हनी सिंगला लग्न सार्वजनिक करायचं नव्हतं म्हणून त्याने साखरपुड्याला त्याला घातलेली हिऱ्याची अंगठीही काढून ठेवली होती. कोणत्याही कॉन्सर्टला किंवा टूरला हनी सिंगसोबत जाण्यासाठी शालिनी विचारणा करायची तेव्हा तो तिला बेदम मारहाण करायाच असाही उल्लेख शालिनीच्या याचिकेत आहे. आपल्या याचिकेमध्ये शालिनीने लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी मॉरिशयला गेल्याचा उल्लेख केलाय. या ट्रीपदरम्यानच हनी सिंगने पत्नीवर हात उचलण्यास सुरुवात केल्याचं याचिकेत म्हटलं आहे. इतकच नाही तर हनी सिंगचे इतर महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचाही दावा याचिकेमध्ये करण्यात आलाय.