२०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाचा सर्वेसर्वा रिषभ शेट्टीचे जगभरात कौतुक होत आहे. चित्रपटाच्या हटके कथेप्रमाणे या चित्रपटातील ‘वराह रूपम’ या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. हेच गाणं आता प्रसिद्ध गायक अरिजित सिंहने गायले आहे.
बॉलिवूडचा आघाडीचा गायक अरिजित सिंह सातत्याने चर्चेत येत असतो. त्याच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. बंगळुरू येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये त्याने कांतारा मधील ‘वराह रूपम’ हे गाणे गायले. अरिजितने त्याच्या खास शैलीत गाणे गायले आहे. त्याने या गाण्याची सुरवात करताच प्रेक्षकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अरिजितचा सध्या या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सारा अली खान नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री आहे शुभमन गिलची क्रश; खुलासा करत म्हणाला, “मला ती…”
‘कांतारा’मधील ‘वराह रुपम’ हे गीत फार विशेष आहे. या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. चित्रपटामध्ये या गाण्याला खास महत्त्व आहे. अजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. तर साई विघ्नेश यांनी त्यासाठी पार्श्वगायन केले आहे. मध्यंतरी यातील ‘वराह रूपम’ गाण्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईमुळे चित्रपट निर्माते आणि चाहते चांगलेच नाराज झाले होते. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि पुन्हा एकदा हे लोकप्रिय गाणं चित्रपटात पाहायला आणि ऐकायला मिळालं.
रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. ‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपट आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे.