दिल्लीसारख्या शहरातून एक सामान्य मुलगा एक स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आला आणि केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्याने त्याचं नाव मोठं केलं. ते नाव म्हणजे शाहरुख खान. तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ शाहरुख लोकांचं मनोरंजन करत आहे. त्याला बऱ्याचदा त्याच्या देशभक्तीवरून तसेच मुलाच्या कृत्यावरून ट्रोल केलं जातं, पण आजवर त्याने कधीच त्याला उत्तर दिलं नाही. त्याने केवळ त्याच्या कामावर लक्ष दिलं. शाहरुख चित्रपटात कसा आला ते सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण एक काळ असा होता जेव्हा शाहरुखच्या वडिलांकडे आपल्या मुलाला चित्रपट दाखवण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते तेव्हा ते नेमकं काय करायचे हे शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
आणखी वाचा : ओटीटी प्ले पुरस्कार २०२२; जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या कलाकारांपैकी कोणाला मिळाला पुरस्कार?
२०१२ च्या थिंकफेस्ट या कार्यक्रमात शाहरुखने त्याचा आणि त्याच्या वडिलांचा हा किस्सा शेअर केला होता. शाहरुख म्हणतो, “माझ्याकडे आज माझं कुटूंब आहे मित्रपरिवार आहे ज्यांच्याबरोबर मी वेळ घालवतो, मला माझ्या वडिलांसारखा मृत्यू नकोय. माझे वडीलही प्रचंड सिनेप्रेमी होते. एक दिवस मला ते चित्रपट बघायला घेऊन गेले. त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने आम्हाला चित्रपट बघता आला नाही, आम्ही तिथेच बाहेर थांबलो. तेव्हा माझ्या वडिलांनी मला तिथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायला सांगितलं आणि आम्ही त्या गाड्या बघत तो वेळ काढला. हीच गोष्ट माझ्या बाबतीत व्हायला नको अशी माझी इच्छा आहे. माझे वडील हे अपयशातही यशस्वी होते आणि मला त्यांचा अभिमान आहे. ( I think my father was most successful failure in the world & i am proud of him.)”
वयाच्या १५ व्या वर्षी शाहरुखने त्याचे वडील गमावले, त्यांनंतर काहीच वर्षात त्याची आईदेखील गेली. “मला अनोळखी म्हणून जगायचं नाही. मला यशस्वी माणूस म्हणून वावरायचं आहे.” असं म्हणत शाहरुखने मुंबई गाठलं आणि चित्रपटसृष्टीत नशीब आजमावलं. चित्रपटसृष्टीने आणि प्रेक्षकांनीही शाहरुखला स्वीकारलं आणि काहीच वर्षात त्याला डोक्यावर घेतलं. १९९१ मध्ये तो गौरीबरोबर लग्नबंधनात अडकला. तेव्हापासून आजवर शाहरुख खान हे नाव आणि त्याच्या भोवतालच्या वलयाला कोणालाच धक्का लावता आलेला नाही.
शाहरुखचे पुढच्या वर्षी ३ चित्रपट येणार आहेत. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्याबरोबर ‘डंकी’ या चित्रपटातही शाहरुख दिसणार आहे.