The Sabarmati Report Teaser: २०२३ च्या अखेरीस बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ’12th Fail’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. प्रेक्षकांचा अनपेक्षित प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. विधू विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटात विक्रांत मेस्सीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची भूमिका निभावली. मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला होता. यासाठी विक्रांतला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या चित्रपटानंतर आता विक्रांत एका वेगळाच विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाची झलक दाखवणारा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. २७ फेब्रुवारीला विक्रांतने याचा टीझर शेअर केला आहे, ही तारीख निवडण्यामागेही आणखी एक कारण आहे ते म्हणजे ‘गोधरा कांड’ हे २७ फेब्रुवारी २००२ रोजीच घडले होते.

आणखी वाचा : “सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म्स तोट्यात”, बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं मोठं विधान

हा टीझर शेअर करताना विक्रांतने लिहिलं, “२२ वर्षांपूर्वी गोधरा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये ५९ लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. याबरोबरच ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझरही शेअर करत आहे जो ३ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” या चित्रपटात विक्रांत एका वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

टीझरमध्ये गोधरा प्रकरणाबद्दल बातमी देताना विक्रांत या घटनेला दुर्घटना किंवा अपघात मानायला तयार नाहीये अन् यामुळेच तो बराच व्यथित दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. चित्रपटात विक्रांत मेस्सीसह राशी खन्ना व रिद्धी डोग्रा या अभिनेत्रीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा टीझर पसंत पडला असून यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail actor vikrant massey upcoming film the sabarmati report teaser out avn