Vikrant Massey Retirement : बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये सुरू आहे. अशातच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट चित्रपटाबद्दलची नसून वैयक्तिक आयुष्यासंदर्भात आहे. या पोस्टमध्ये त्याने अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे.
’12th फेल’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर विक्रांत बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. आता त्याने ३७ व्या वर्षी निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं. ‘सेक्टर 36’ आणि ‘दिलरुबा’ सारखे आशयभिन्नता असणारे सिनेमे देणाऱ्या विक्रांतने २ डिसेंबर रोजी एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा
विक्रांत मॅसीची पोस्ट
“माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे,” असं विक्रांत मॅसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पुढे त्याने लिहिलं, “योग्य वेळ येऊपर्यंत, येत्या २०२५ मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा काय ऋणी राहीन.”
विक्रांतने ही पोस्ट केल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्याला हा निर्णय घेऊ नकोस असं म्हटलं आहे. तर काहींना हार्टब्रेक झालेले इमोजी कमेंट केले आहेत. तू भारतातील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहेस, त्यामुळे इंडस्ट्री सोडून जाऊ नकोस, असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री इशा गुप्ताने विक्रांतच्या या पोस्टवर त्याचं नाव व रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत.
टीव्ही मालिका ते चित्रपट असा विक्रांत मॅसीचा प्रवास राहिला. छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विक्रांतने अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान व चाहतावर्ग निर्माण केला. विक्रांतने ही पोस्ट केल्यानंतर तो खरंच निवृत्ती घेतोय की हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलं जातंय, असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.