गेले काही दिवस ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू होती. वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. प्रथम यातून अक्षय कुमार बाहेर पडला असल्याची बातमी समोर आली त्यानंतर त्याच्या जागी कार्तिक आर्यनची वर्णी लागल्याचं समोर आलं. यामुळे या चित्रपटाचा चाहतावर्ग चांगलाच निराश झाला. यानंतर काहीच दिवसांपूर्वी जुन्याच कलाकारांसह ‘हेरा फेरी ३’ येत असल्याची घोषणा झाली आणि कित्येकांचा जीव भांड्यात पडला.
२३ वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी २००० साली पहिला ‘हेरा फेरी’ प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. यातील डायलॉग्सचे भरपूर मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या चित्रपटाला २३ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त याचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी ‘बॉलिवूड हंगमा’शी संवाद साधताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘हेरा फेरी’ २००० साली जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा मात्र सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद आणि त्यानंतर झालेला चमत्कार याबद्दल फिरोज यांनी या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “आम्ही कोणतीही तडजोड…” अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागांबद्दल मोठा खुलासा
फिरोज म्हणाले, “त्यावेळी चित्रपटाचे प्रोमो एमटीव्ही, सोनी आणि झीच्या चॅनल्सवर यायचे. आम्ही चित्रपटाचे प्रोमो शुक्रवारी रात्री पाठवायचो आणि टीव्ही चॅनल्स ते प्रोमोज रविवारी दाखवायचे. हेरा फेरीच्या वेळीसुद्धा मी असाच प्रोमो एडिट करत होतो, शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला, काही वेळाने मला उत्तरेकडच्या राज्यातील एका चित्रपट वितरकाचा फोन आला. फोनवर त्याने सांगितलं की चित्रपटाला अत्यंत खराब प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट फ्लॉप झालाच असं समजा. मला चांगलाच धक्का बसला तरी मी माझं काम सुरूच ठेवलं.”
पुढे फिरोज म्हणाले, “काही तासांनी परिस्थिती सुधारली. संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान मला असाच एका वितरकाचा फोन आला. त्याने सांगितलं की चित्रपटगृहात डायलॉगसुद्धा प्रेक्षकांना ऐकू येत नाहीयेत. मी म्हंटलं की बरोबर आहे जर प्रेक्षकच नसतील तर त्यांना डायलॉग कसे ऐकू येतील? पण त्यावर वितरकाने मला मूर्खात काढलं. प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं माझ्या कानावर पडलं. दुपारी १२ ते ३ मध्ये ज्यांनी चित्रपट पाहिला त्यापैकी कित्येक प्रेक्षक त्यांचे नातेवाईक, कुटुंब, मित्रपरिवाराला घेऊन पुन्हा आले असल्याचं मला वितरकाने सांगितलं. प्रेक्षकांना चित्रपट आवडला होता. नंतर मी मुंबईतील काही चित्रपटगृहात फोन केला आणि तिथूनही मला असाच प्रतिसाद मिळाला. हे ऐकून मी परमेश्वराचे आभार मानले.”
आणखी वाचा : …म्हणून ‘बॉम्बे’ चित्रपटात काम न करण्याचा लोकांनी दिलेला सल्ला; मनीषा कोईराचा खुलासा
‘हेरा फेरी’नंतर ‘हेरा फेरी २’देखील आला आणि प्रेक्षकांनी त्यालाही डोक्यावर घेतलं. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या भूमिका प्रेक्षकांनी अजरामर केल्या. आता पुन्हा ‘हेरा फेरी ३’मध्ये याच तिघांची धमाल बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.