28 years of Raja Hindustani : बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट २८ वर्षांपूर्वी आला होता. या रोमँटिक चित्रपटाची त्याकाळी खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. १९९६ साली आलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे बजेट खूप कमी होते, त्या तुलनेत सिनेमाने जगभरात जबरदस्त कमाई केली होती.
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. ‘राजा हिंदुस्तानी’ मध्ये आमिर खान व करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. किंबहुना २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गाणी आजही श्रोते ऐकत असतात. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकार सगळंच कमाल होतं.
हेही वाचा – ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
अनेक अभिनेत्रींचा नकार अन् करिश्माची वर्णी
खरं तर या चित्रपटासाठी करिश्मा दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश यांनी १९९६ मध्ये आलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आधी ऐश्वर्या रायला ऑफर दिली होती, तिने नकार दिला; मग जूही चावलाला ऑफर दिली पण तिनेही ऑफर नाकारली, त्यानंतर त्यांनी पूजा भट्टला सिनेमा ऑफर केला, पण तिने नकार दिला. त्यानंतर आमिरने धर्मेश यांना सल्ला दिला की त्यांनी अशा अभिनेत्रीला घ्यावं, जिच्याबरोबर त्याने आधी चित्रपट केला नाही. त्यानंतर करिश्माला या चित्रपटात घेण्यात आलं होतं.
‘राजा हिंदुस्तानी’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘राजा हिंदुस्तानी’ या रोमँटिक चित्रपटाचे बजेट खूप कमी होते, मात्र या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्ट ठरला होता. ५.७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशभरात ४३.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाने ७६.३४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. खास गोष्ट म्हणजे फिल्मफेअरसाठी नॉमिनेट केला होता. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक कलाकार होते.