समीर जावळे
Deewaar 50th Anniversary : “उफ.. रवी, तुम्हारे उसूल तुम्हारे आदर्श, इन्हे गुंद कर एक वक्त की रोटी नहीं बनायी जाती. हम दोनो एक ही फूटपाथ से उठे थे. लेकिन आज मै कहाँ आ गया और तुम कहाँ रह गये. एक पुलीस की नौकरी, चार पाचसौं रुपये तनख्वाँ, पुलीस की सर्व्हिस जीप. आज मुझे देखो मेरे पास बिल्डिंगे है, प्रॉपर्टी है, बँक बॅलन्स है. क्या है तुम्हारे पास?” रवीचं शांत पण भेदक उत्तर : “मेरे पास माँ है”
सलीम जावेद स्पेशल ‘दीवार’
दीवार सिनेमातला हा अजरामर संवाद. त्यापाठोपाठ होणारी दोन डब्यांची सूचक टक्कर. सगळं सगळं काही सलीम जावेद स्पेशल. या आणि अशा अनेक गाजलेल्या संवादांवर दिवार उभा आहे, नुसता उभा नाही तर ५० वर्षांचा झाला आहे. होय, अमिताभ, शशी कपूर, निरुपा रॉय, सत्येन कपूर, नीतू सिंग, परवीन बाबी, इफ्तिकार अशा कलाकारांची फौज असलेला ‘दीवार’ सिनेमा ५० वर्षांचा झाला आहे. सलीम जावेद या जोडीने जे २१ सुपरहिट चित्रपट दिले त्यातला ‘दीवार’ हा मास्टर पीस.
‘दीवार’मधला अमिताभने साकारलेला ‘विजय’ हाजी मस्तानच्या आयुष्यावर बेतला होता अशाही चर्चा
अमिताभला ‘जंजीर’ने ‘अँग्री यंग मॅन’ केलं. पण त्याच्या या बिरुदावर चार चाँद लावले ते ‘दीवार’ने. ‘दीवार’मधली त्याची भूमिका ही हाजी मस्तान या कुख्यात डॉनवर बेतलेली होती असेही किस्से त्यावेळी रंगले होते. मात्र लहानपणी झालेल्या अन्यायाचा बदला घेणारा, हातावर ‘मेरा बाप चोर है’ हे गोंदलं गेल्याने आयुष्य त्याच काळोख्या दुनियेत झोकून देणारा अमिताभचा ‘विजय’ लोकांना भावला. ‘अँग्री यंग मॅन’ ही त्याची इमेज दीवारने आणखी अधोरेखित केली. सिनेसृष्टीचा अनिभिषिक्त सम्राट होण्याकडे त्याची पावलं पडली त्यात ‘दीवार’ सिनेमा हे अत्यंत निर्णायक पाऊल ठरलं. यश चोप्रांचं दिग्दर्शन, सलीम-जावेदची लेखणी, आर. डी. बर्मन यांचं संगीत अशी सगळी भट्टी खूप उत्तम जमून आली. अत्यंत खास ठरले ते यातले संवाद. जे कालातीत आहेत. लोकांना तसेच्या तसे पाठ आहेत.
राजेश खन्ना करणार होता विजयची भूमिका
‘दीवार’ सिनेमाचे निर्माते गुलशन राय होते. त्यांनी खरंतर या सिनेमासाठी राजेश खन्नाला साईन केलं होतं. विजयची भूमिका राजेश खन्नाच्या वाट्याला जाणार होती. मात्र सलीम जावेद यांच्या आग्रहाखातर ही भूमिका अमिताभच्या वाट्याला आली. याबाबत सलीम खान असं म्हणाले होते की; “दीवारची भूमिका राजेश खन्नाच्या वाट्याला आली असती तर सिनेमा कदाचित चाललाही असता. पण आम्हाला वाटलं की अमिताभ बच्चनच विजयच्या भूमिकेसाठी चपखल आहे. त्यामुळे आम्ही गुलशन राय यांना हे सांगितलं. पुढे जे घडलं तो इतिहासच ठरला.” सिनेमासाठी अमिताभ बच्चन पहिली निवड नव्हता. तर राजेश खन्ना तसंच शत्रुघ्न सिन्हा, नवीन निश्चल यांच्याशीही बोलणी सुरु होती. पण सलीम जावेद अमिताभ बच्चनसाठी आग्रही होते. त्यामुळे अमिताभला ही भूमिका मिळाली, ज्याचं त्याने सोनं केलं.
गुलशन राय यांना दोन वाक्यांत कथा ऐकवली गेली होती
गुलशन राय यांना जेव्हा सलीम जावेद ही कथा दोन वाक्यात ऐकवली होती. गुलशन राय यांना हे दोघं इतकंच म्हणाले होते की आमच्याकडे एक कथा आहे. त्या कथेचा सारांश इतकाच आहे की ‘गंगा जमुना’ ‘मदर इंडिया’ला भेटतात. गुलशन राय म्हणाले ठीक आहे ऐकवा गोष्ट. या जोडीने गोष्ट ऐकवली आणि जन्माला आला ‘दीवार’ नावाचा एक खास सिनेमा.
दीवारची कथा थोडक्यात
‘दीवार’ सिनेमा म्हणजे एक प्रामाणिक आपल्या तत्त्वांवर चालणारा युनियन लीडर आनंदबाबू (सत्येन कपूर ) त्याची पत्नी सुमित्रा (निरुपा रॉय) विजय (अमिताभ बच्चन) आणि रवी ( शशी कपूर) या चौकोनी कुटुंबाची गोष्ट आहे. बायको आणि मुलांना कंपनीच्या मालकाने गुंडाकरवी ओलीस ठेवलंय. त्यामुळे आनंदबाबू समझौता करतो. त्याचा परिणाम म्हणजे युनियनच्या सगळ्या कामागरांचा त्याच्यावर प्रचंड रोष, त्याला मारहाण. स्वतःच्या तत्त्वांवर चालणाऱ्या आनंदबाबूची वाताहात होते. तो पुढे फक्त अनंताचा प्रवास करतानाच दाखवला आहे. त्याला एकदा विचारलं जातं तू कुठे चालला आहेस? “कहीं नहीं.” हे त्याचं उत्तर जे त्याची उद्विग्नता दाखवतं. इकडे सुमित्रा आणि तिच्या दोन मुलांवर समाज खार खाऊन आहे. एक दिवस तिच्या मोठ्या मुलाच्या म्हणजेच विजयच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ लिहिलं जातं आणि मग सुरु होतो आयुष्यातला खरा संघर्ष. दोन मुलांना घेऊन मुंबईत आलेली सुमित्रा मोलमजुरी करु लागते. एक दिवस ती दुसरा मुलगा रवी कुठे गेला? म्हणून पाहू लागते तिला तो शाळेच्या गेटवर सारे जहाँ से ऐकताना दिसतो. आईचं काळीज चरकतं. तिला रडू येतं. तेव्हा तिचा विजय तिला म्हणतो, “माँ हम दोनो तो इतने पैसे कमां सकते है जिससे रवी स्कूल जा सके.” विजय बूट पॉलीश करु लागतो. आई मोल मजुरी. पुढे विजय पोर्टवर हमाली करु लागतो आणि रवी पोलिसात नोकरी करु लागतो. त्यानंतर एका हाणामारीनंतर विजयच्या आयुष्याचा सुवर्णकाळ सुरु होतो. परस्पर दुश्मनी असलेल्या डाबर सेठ आणि सामंत यांच्यातल्या डाबर सेठला विजय मधला लंबी रेसचा घोडा त्याच्या लहानपणी “मै आज भी फेके हुये पैसे नहीं उठाता” म्हणतानाच दिसलेला असतो. तो विजय आणि आपल्याला भेटलेला विजय एकच आहे हे कळल्यावर डाबर सुखावतो. पुढे विजयची आर्थिक भरभराट होते, तो कुख्यात स्मगलर होतो. एकीकडे आदर्श पाळणारा रवी दुसरीकडे स्मगलिंगसारख्या वाम मार्गाला लागलेला विजय यांच्यात आपोआप एक भिंत उभी राहते. ही भिंत संघर्षाची असते, ही भिंत मतभेदांची असते, ही भिंत विचारांची असते, ही भिंत आईसाठी उभी राहते, ही भिंत दोन भावांच्या नात्यांमधली असते. ‘दीवार’ सिनेमाची ही थोडक्यात कथा. अमिताभ बच्चनच्या आयुष्यातला ‘दीवार’ हा सर्वाधिक यशस्वी सिनेमा म्हणून ओळखला जातो. ‘दीवार’मध्ये त्याची आणि परवीन बाबीची जोडीही हिट ठरली. शिवाय अमिताभ-शशी कपूर, अमिताभ निरुपा रॉय यांच्यातल्या संवादाची जुगलबंदीही जबरदस्त अशीच होती. त्यामुळेच ‘दीवार’ वेगळा ठरतो.
‘दीवार’ नावाची जादू आजही कायम
अगदी पाच सहा वर्षांपूर्वी आलेल्या द सेक्रेड गेम्समधला गणेश गायतोंडेही (नवाजुद्दीन सिद्दीकी) त्याच्या कुक्कूला म्हणतो, “मेरी जिंदगी मे एक तमन्ना है, मै दीवार के अमिताभ के जैसे तुम्हे बाहों मे ले लूं तू दो सिगरेट सुलगाये और एक मुझे देदे.” ‘दीवार’ची जादू ही इथेही कळतेच. इतकी वर्षे होऊनही हा सिनेमा आणि त्याचं गारुड कमी झालेलं नाही. ‘मेरा बाप चोर है’ हे वाक्य हातावर नाही तर आयुष्यावर, मनावर कोरला गेलेला विजय आणि वडिलांच्या म्हणजेच आनंद बाबूच्या मार्गावर चालणारा साधा सरळ रवी. रवी आस्तिक, विजय नास्तिक, दोघांचा संघर्ष इथेही दिसून येतो. तसंच, “जब तक एक भाई बोल रहा है, तब तक एक भाई सुन रहा है, जब एक मुजरिम बोलेगा एक पुलीस अफसर सुनेगा” हा रवीच्या तोंडी असलेला संवाद त्यांच्यातल्या संघर्षाच्या ‘दीवार’ने केवढी उंची गाठली आहे ते दाखवून देतो.
आज खुश तो बहुत होगे तुम, अमिताभचा तो गाजलेला सीन
आईवर प्रचंड प्रेम असलेला विजय जेव्हा आई रुग्णालयात असते तेव्हा तिच्यासाठी मंदिरात पोहचतो तो सीनही अमिताभने करावा आणि आपण बघत रहावं. “आज खुश तो बहोत होगे तुम.” हे अमिताभने शंकराच्या मूर्तीसमोर म्हणणं आणि त्यापुढचे सगळा संवाद हे विजयच्या आयुष्याचा, त्याच्या संघर्षाचा एक निराळाच रंग समोर आणतात.
‘दीवार’चे रिमेकही झाले
‘दीवार’ या सिनेमावर चीनमध्ये ‘टू ब्रदर्स’ नावाचा एक सिनेमाही तयार करण्यात आला. १९७९ मध्ये चीनमध्ये हा रिमेक करण्यात आला. त्यातही एक भाऊ गुन्हेगारीकडे वळतो आणि दुसरा प्रामाणिक तत्त्वांवर चालतो हेच दाखवण्यात आलं होतं. ‘दीवार’मध्ये अमिताभकडे तो हमाली करत असतानाचा एक बिल्ला दाखवला आहे त्यावर 786 असं लिहिलेलं असतं. ‘टू ब्रदर्स’मध्ये एका भावाकडे जो बिल्ला दाखवला आहे त्यावर 838 असं लिहिलेलं होतं. हा क्रमांक म्हणजे चायनीज इयर ऑफ हॉर्सचं प्रतीक आहे. ‘दीवार’चा रिमेक फक्त चीनमध्ये झाला नाही. तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळमध्येही रिमेक केले गेले. यामध्ये अनुक्रमे रजनीकांत, एन. टी. रामाराव आणि मामूटी यांनी ‘विजय’ ही भूमिका साकारली होती. तसंच ८० च्या दशकात तुर्कस्तानातही दीवारचा रिमेक झाला होता. ‘दीवार’ सिनेमाला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र या सिनेमाची जादू ओसलेली नाही. सशक्त कथा-पटकथा, उत्तम संगीत आणि उत्तम अभिनय या सगळ्याच्या जोरावर ‘दीवार’ लोकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे. यापुढेही करत राहिल यात शंका नाही.