‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण तसं जरी असलं तरीही या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात मोठी कमाई केली होती.
हेही वाचा- परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा भारतात येणार? चर्चांना उधाण
चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रेमाने दिग्दर्शक सुदीप्तो सेन भारावून गेले आहेत. सेन यांनी ट्वीट करत याबाबत आभार मानले आहेत. सेन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. भारतात आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बघितला आहे. आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. ‘द केरला स्टोरी’ एकाच वेळी ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. अधिकाधिक संख्या जोडल्या जात आहेत. अधिकाधिक आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मला भारावून टाकत आहे. आम्हाला आणखी जबाबदारी वाढल्यासारखं वाटत असल्याचे सेन यांनी ट्वीटमध्ये म्हणलं आहे.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दिवसेंदिवस चांगली कमाई करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी १२ कोटींचा गल्ला जमवला. तर या चित्रपटाने सहाव्या दिवशीदेखील १२ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत या कमाईच्या आकडेवारीमध्ये फरक पडलेला नाही. तर त्याआधी या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या दिवशी ११.१२ कोटी, तिसऱ्या दिवशी १६.४० कोटी, चौथ्या दिवशी १०.७ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१४ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई ही ८० कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे आता येत्या एक-दोन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असा सर्वांना विश्वास वाटत आहे.