‘७२ हूरें’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. टीझर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादात सापडला होता. सेन्सॉर बोर्डाने ट्रेलर पास करण्यास नकार दिल्यानंतरही निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर डिजिटली प्रदर्शित केला. एकीकडे चित्रपटावरून हा वाद सुरु असतानाच दुसरीकडे, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात ‘७२ हूरें’चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका का लोकप्रिय ठरली? अमेय वाघ कारण सांगत म्हणाला, “आम्ही मित्र…”
‘७२ हूरें’चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह चौहान यांनी केले असून अशोक पंडित, गुलाबसिंग तन्वर, अनिरुद्ध तन्वर आणि किरण डागर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा : Video : कार्तिक-कियाराने एकत्र गायलं रोमॅंटिक गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “यापुढे कधीच एकत्र गाणं…”
‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अरिफअली महमोदअली यांनी ही तक्रार दाखल केली असून, या चित्रपटाच्या दिग्दर्शकासह चार निर्मात्यांवर धर्माचा अपमान करून भेदभाव, द्वेष निर्माण करणे तसेच विशिष्ट समुदाय आणि मुस्लीम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच बनावट प्रचाराद्वारे पैसे कमावल्याचा आरोपही चित्रपटाच्या निर्मात्यांवर या तक्रारीत आला आहे.
हेही वाचा : “दोन मुलांनी माझा पाठलाग केला अन्…”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन दहशतवाद्यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षणादरम्यान ‘तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील’ असे आश्वासन देऊन त्यांचा ब्रेनवॉश केला जातो असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाने पास करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, असे असतानाही चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘७२ हूरें’ चा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केला. यानंतर संपूर्ण वादास सुरुवात झाली. यापूर्वी मौलाना साजिद रशीद यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवत धार्मिक शिकवण चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला होता.
चित्रपटात पवन मल्होत्रा, आमिर बशिर, राशिद नाज, अशोक पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत असून,‘७२ हूरें’ ७ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ट्रेलरमधून जाहीर करण्यात आले आहे.