भारत १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींना आदरांजली वाहिली जाते.
गेल्या अनेक वर्षांत चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट तयार केले आहेत, जे देशभक्तिवर आधारित आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवताना घडलेल्या प्रसंगांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. चला तर जाणून घेऊयात, ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणते चित्रपट तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर पाहिले जाऊ शकतात.
१. लगान
आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कथानक ब्रिटीश काळातील आहे. जेव्हा ब्रिटीश राज्यकर्त्यांकडे गावकरी कर कमी करण्याची मागणी करतात, तेव्हा गावकऱ्यांनी जर क्रिकेटची मॅच जिंकून दाखवली तर कर माफ करणार, अशी अट त्यांच्यापुढे ठेवली जाते. गावकरी तो खेळ शिकण्यापासून ते जिंकण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये दाखवला आहे. हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांत या चित्रपटाचा स्वतंत्र चाहतावर्गही तयार झाला आहे.
२. रंग दे बसंती
‘रंग दे बसंती’ या चित्रपटातदेखील आमिर खानची प्रमुख भूमिका आहे. कॉलेजमधील मित्रांचा गट स्वातंत्र्य सैनिकांची कथा असलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये भाग घेत असताना त्यांना जाणवते की, स्वातंत्र्यसेनानींचा ज्या गोष्टींवर विश्वास होता, त्याला पाठिंबा द्यायचा. याबरोबरच आधुनिक समाजातील भ्रष्टाचार संपवण्याचे त्यांना महत्त्व समजते. या चित्रपटात आमिर खानबरोबरच सोहा अली खान, आर माधवन, शरमन जोशी आणि कुणाल कपूर यांच्याही भूमिका आहेत.
३. चक दे इंडिया
मुलींच्या हॉकी या खेळाविषयी असणारा चित्रपट मोठा लोकप्रिय ठरला होता. शाहरुख खान या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भूमिकेत कबीर खान या भूमिकेत दिसतो. महिला हॉकी टीम संपूर्ण जगाला आपले वेगळेपण कसे दाखवून देते, हे या चित्रपटात पाहायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे, भारताच्या अनेक क्रीडा महोत्सवावेळी या चित्रपटाचे टायटल साँग लावले जाते.
४. राझी
२०१८ ला गुप्तहेरावर आधारित ‘राझी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमत या पुस्तकावर आधारित आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धापूर्वीची गोष्ट यामध्ये दाखविली आहे. आलिया भट्ट बरोबरच विकी कौशल, रजत कपूर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
५. शेरशाह
कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात विक्रम बत्रा आणि त्यांचे जुळे भाऊ विशाल बत्रा यांची भूमिका निभावली आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.