रवीना टंडन ही जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच माणूस म्हणूनही चांगली आहे. तिचं प्राणी प्रेम हे जग जाहीर आहे. प्राण्यांसाठी तिला जितकी शक्य होईल तितकी मदत ती नेहमीच करत असते. पण आता तिने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून बछड्याला तिचं नाव देण्यात आलं आहे.
रवीना ही तिचं प्राणीप्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच व्यक्त करत असते. प्राण्यांच्या मदतीसाठी ती कायम पुढे सरसावलेली दिसते. अनेक वेळा ती जंगल सफारीला जाऊन प्राण्यांचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. तसंच प्राण्यांना येणाऱ्या अडचणी कशा कमी करता येतील याकडेही ती लक्ष देते.
आणखी वाचा : Video: अक्षय कुमारच्या मुलाला विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी थांबवलं, व्हिडीओ चर्चेत
सध्या सर्वत्र थंडी वाढली आहे. या थंडीचा त्रास प्राण्यांना होऊ नये यासाठी तिने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रवीनाने कानपूर अभयारण्यातील प्राण्यांना थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही हीटर्स आणि आवश्यक औषधं पाठवली. तिने प्राण्यांसाठी दाखवलेल्या या प्रेमाबद्दल आणि तिच्या मदतीची परतफेड म्हणून येथील वाघिणीच्या एका बछड्याला रवीना हे नाव देण्यात आलं आहे.
हेही वाचा : “तो मला रक्ताने…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा
रवीनाने पाठवलेली मदत अभयारण्यात पोहोचली आणि त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रवीनाने केलेल्या मदतीबद्दल कानपूर अभयारण्यातील कर्मचारी तिचे आभार मानताना दिसत आहेत. त्यांच्याप्रमाणेच रवीनाच्या या कामामुळे तिच्या चाहत्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.