जागतिक संगीतावर आपली छाप सोडणारे भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांना कोण ओळखत नाही? संगीतक्षेत्रात रेहमान या नावाचा प्रचंड दबदबा आहे. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो.
वडिलांचं निधन झाल्यावर अगदी लहान वयातच त्यांनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान रेहमान यांची आई कारीमा बेगम यांनी रेहमानच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता. या मुलाखतीमध्ये रेहमान यांच्या आईनेच त्यांना शालेय शिक्षण सोडण्यास सांगितल्याचा त्यांनी खुलासा केला होता.
आणखी वाचा : काश्मीरमध्ये ‘पठाण’नंतर ‘ओपनहायमर’साठी लोक उत्सुक; वीकेंडपर्यंतचे सगळे शो हाऊसफुल्ल
‘ओ२ इंडिया’शी संवाद साधतांना रेहमान यांची आई त्या मुलाखतीमध्ये म्हणाली, “तो माझ्याशी बऱ्याचदा वाद घालायचा, एकतर त्याला शिक्षण घ्यायला जमेल किंवा संगीतक्षेत्रात काम करायला जमेल. तेव्हा आमच्या रोजचा पोटापाण्याचा प्रश्नही समोर होता, म्हणून त्यावेळी मीच त्याला शालेय शिक्षण सोडून संगीतात पूर्णपणे काम करण्यास सांगितले.”
मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान रेहमान यांनीही त्यांना शालेय शिक्षण सोडावं लागल्याचं दुःख वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रेहमान ९ वर्षांचे असतानाच त्यांचे वडील आरके.शेखर यांचे निधन झाले होते, त्यानंतर वयाच्या ११ व्या वर्षांपासून रेहमान यांनी संगीतक्षेत्रात काम सुरू केले. आज ए आर रेहमान हे नाव भारतातच नव्हे तर जगभरात अभिमानाने घेतले जाते.