A R Rahman : ‘दिल से’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘जय हो’, ‘बॉम्बे’, ‘रंगीला’, ‘ताल’, ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा-अकबर’, ‘स्लमडॉग मिलेनियर’सारख्या अनेक चित्रपटांना संगीत देणारे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी आजवर केलेल्या गाण्यांमुळे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रहमान यांनी आजवर अनेक अजरामर गाणी दिली आहेत आणि त्यांची ही गाणी त्यांनी रात्रीच्या वेळेस केली असल्याचं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.
“मी दिवसा कधीच प्रवास करत नाही”
रहमान यांनी मॅशेबल इंडियाशी साधलेल्या संवादात लवकर झोपणे आणि लवकर उठणे कंटाळवाणे असल्याचे म्हटलं. तसंच त्यांनी इतरांच्या वागण्यापेक्षा मी उलट वागत असल्याचेही म्हटलं. यावेळी रहमान यांनी असं म्हटलं की, “मी दिवसा कधीच प्रवास करत नाही. रात्री वाहतूक नसल्याने मी रात्रीचा प्रवास करतो. यामुळे मी कुठेही जाऊ शकतो. मी कधीकधी सकाळी लवकर दर्ग्यात जातो आणि नंतर वाहतूक सुरू होण्यापूर्वी मी झोपतो. ‘ताल’ चित्रपटापासून हे असंच सुरू आहे.”
“रात्री झोपणे आणि सकाळी उठणे खूप कंटाळवाणे”
यानंतर त्यांनी असं म्हटलं की, “माझ्या जीवनशैलीसाठी रात्री झोपणे आणि सकाळी उठणे खूप कंटाळवाणे आहे. मी ते वाईट आहे असं म्हणत नाही. पण मी सहसा पहाटे २:३० वाजता उठतो आणि सकाळी ७ वाजता झोपतो. प्रवास करायचा असल्यासही मी रात्रीचाच करतो.” रहमान यांच्या या सवयीबद्दल ‘ताल’चे दिग्दर्शक सुभाष घई यांनी जुनी आठवणी शेअर केली होती. याबद्दल सुभाष घई यांनी “रहमान सहसा रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रेकॉर्डिंग करतात” असं म्हटलं होतं.
ए. आर. रेहमान यांच्याबद्दल थोडक्यात
दरम्यान, ए. आर. रेहमान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर संगीतातील योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत सहा राष्ट्रीय पुरस्कार, दोन अकॅडमी पुरस्कार आणि दोन ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय ‘गोल्डन ग्लोब’ अवॉर्ड, सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, अनेक ‘फिल्मफेअर’ पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाले आहेत. २०१० मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. संगीतातील नवनवीन प्रयोगामुळे ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
ए. आर. रेहमान यांच्या कामाबद्दल थोडक्यात
ए. आर. रेहमान त्यांच्या चित्रपटातील संगीतासाठी ओळखले जातातच. पण त्यांच्या लाईव्ह गाण्याच्या कार्यक्रमांनाही चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. येत्या ३ मे रोजी, मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये रेहमान यांचा एक कार्यक्रम आहे. यावर्षी तो त्याच्या ‘वंडरमेंट’ कॉन्सर्टसह अमेरिकेतील १८ शहरांचा दौरा करणार आहे. नुकतंच त्याने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला संगीत दिले. त्यानंतर आता तो कमल हसनच्या ‘डोक लाईफ’ चित्रपटासाठी संगीत देत आहे.