शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे.
सोशल मीडियावर या चित्रपटातील बरेच सीन्स, डायलॉग तसेच फोटोज व्हायरल होत आहेत. याबरोबरच चित्रपटातील शाहरुख खानचा क्लायमॅक्सच्या मोनोलॉगचीही चांगलीच चर्चा होत आहे. या मोनोलॉगमध्ये शाहरुखचं पात्र सामान्य जनतेला मतदानाच्या अधिकाराबद्दल आणि त्याकडे कितपत गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं याविषयी भाष्य करतं.
आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ बांग्लादेशमध्ये अद्याप प्रदर्शित झालेला नाही; काय आहे नेमकं कारण?
नुकतंच ‘आम आदमी पार्टी’च्या सोशल मीडिया हँडलवर ‘जवान’मधील या मोनोलॉगबद्दल वाच्यता करण्यात आली आहे. याबरोबरच या ट्वीटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी या गोष्टी याआधीही बऱ्याचदा भाषणात सांगितल्याचंही नमूद केलं गेलं आहे. शिवाय या ट्वीटमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या भाषणातील एक छोटीशी क्लिपही जोडण्यात आली आहे.
या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “जे अरविंद केजरीवाल इतकी वर्षं बोलतायत तीच गोष्ट आज शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये सांगण्यात आली आहे.” पुढे या ट्वीटमध्ये जवानमधील तो डायलॉगही मांडला आहे. तो डायलॉग असा की, “भय, पैसा, जात-पात, धर्म, संप्रदाय याच्याआधारे मतदान करण्याऐवजी जे तुमच्याकडे मतं मागायला येतात त्यांना पुढील प्रश्न विचारा. पुढच्या ५ वर्षात ते आपल्यासाठी काय करणार हे त्यांना विचारा. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते काय करणार याबद्दल त्यांना विचारा. या देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी काय करणार याबद्दल विचारा.”
दरम्यान, या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरातून १०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. याबरोबरच आता ‘जवान’चा दूसरा भाग येणार की नाही याबद्दलही चर्चा सुरू आहे.