बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेक कारणाने चर्चेत राहत असतो. अशातच नुकतंच त्याने त्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त नवीन नात्याची घोषणा केली. २५ वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या गौरीबरोबर रिलेशनमध्ये असल्याचं आमिरने सांगितलं. गौरीबरोबर आमिरचे हे तिसरे रिलेशनशिप असून याआधी त्याची दोन लग्न झाली आहेत. त्याने पहिलं लग्न रीना दत्ताशी केलं होतं. या दोघांना आयरा आणि जुनैद ही मुलं आहेत. लग्नाच्या १५ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

त्यानंतर आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. किरण रावसोबतही आमिरचा संसार १५ वर्षे टिकला. यादरम्यान, आमिरचे नावं इतरही काही अभिनेत्रींबरोबर जोडली गेली होती. किरण रावला घटस्फोट दिल्यानंतर आमिर आणि ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. किंबहुना फातिमामुळेच आमिरने किरणला घटस्फोट दिल्याचं म्ह्टलं गेलं होतं. याबद्दल आता स्वत: फातिमाने भाष्य केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने या अफेअरच्या चर्चांबद्दल सांगितलं.

फिल्मफेअरशी संवाद साधताना फातिमाला आमिर खानबरोबरच्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. यावेळी अभिनेत्रीने उत्तर डेट म्हणाले की, “मला याचा त्रास व्हायचा कारण यापूर्वी अशा गोष्टींचा कधी सामना केलेला नाही. काही अनोळखी लोक आहेत, ज्यांना मी कधीही भेटलेही नाही, ते माझ्याबद्दल काहीतरी लिहीत आहेत. त्या लोकांना यात काही तथ्य आहे की नाही हे देखील माहित नाही.”

यापुढे अभिनेत्री म्हणाली की, “मला याचा त्रास होतो, कारण चुकीच्या गोष्टीसाठी लोकांनी मला गृहीत धरावं असं वाटत नाही. पण मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. तरीही, असे काही दिवस येतात जेव्हा मला त्याचा त्रास होतो.” पुढे आमिरचे कौतुक करताना फातिमा म्हणाली की, “त्याच्याबरोबर काम करणे खूप सोपे आहे आणि तो खूप उदार व्यक्ती आहे.”

फातिमा आणि आमिरने ‘दंगल’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबद्दल फातिमाने याआधीही भाष्य केलं होतं. याबद्दल तिने “हे सगळं माझ्यासाठी खूप विचित्र आहे. जेव्हा जेव्हा माझी आई हे सगळं टीव्हीवर पाहायची तेव्हा तिला खुप दु:ख होतं होतं” असं म्हटलं होतं.