Aamir Khan Affairs: मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिरने त्याच्या ६० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे. दोन वेळा घटस्फोटित असलेला आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. तो त्याची २५ वर्षांपासूनची मैत्रीण गौरीला डेट करतोय. दीड वर्षांपासून दोघे एकत्र आहेत.
आमिर म्हणाला, “मी आणि गौरी २५ वर्षांपासून मित्र आहोत आणि आता आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकमेकांबद्दल गंभीर आहोत आणि कमिटेड आहोत. आम्ही दीड वर्षांपासून सोबत आहोत.” लग्नाबद्दलही आमिरने भाष्ये केलं. ६० व्या वर्षी लग्न करणं शोभतं की नाही माहीत नाही, असं तो म्हणाला. तसेच गौरीबरोबरच्या नात्यात आनंदी असल्याचं आमिरने नमूद केलं आहे. आमिरने प्रेमाची कबुली दिली आहे, त्यानिमित्ताने त्याच्या अफेअर्सबद्दल जाणून घेऊयात.
आमिर खानची अफेअर्स
आमिर खानने दोनदा लग्न केले आहे. त्याने पहिलं लग्न रीना दत्ताशी १९८६ साली केलं होतं. रीना व आमिर यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. या लग्नापासून आमिर खानला आयरा आणि जुनैद खान ही दोन अपत्ये आहेत. २००२ मध्ये आमिर व रीनाचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरच्या आयुष्यात किरण राव आली. किरण व आमिर यांना आझाद नावाचा मुलगा आहे. या दोघांनी २०२१ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. आता आमिरने गौरीला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे.
आमिरच्या लग्नाव्यतिरिक्त त्याच्या अफेअरच्या चर्चाही खूप झाल्या. बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. आमिर व ममता कुलकर्णी यांचं अफेअर होतं असं म्हटलं जातं. त्यावेळी आमिर विवाहित होता. आमिर किंवा ममता यांनी कधीच याबाबत भाष्य केलं नाही.
या व्यतिरिक्त आमिरचे नाव अभिनेत्री पूजा भट्टबरोबर जोडले गेले होते. त्यावेळीही आमिर खान विवाहित होता. तसेच आमिर व ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स यांच्या अफेअरची चर्चाही झाली होती. जेसिकासोबतच्या अफेअरमुळे आमिर खान खूप वादात सापडला होता. ब्रिटिश पत्रकार जेसिकाने दावा केला होता की आमिर खान तिच्या मुलाचा बाबा आहे.
२६ वर्षांनी लहान अभिनेत्रीबरोबर जोडलं गेलं नाव
आमिर खानचे नाव रेचल शैलीसोबतही जोडलं गेलं होतं. त्यांनी ‘लगान’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही, असं म्हटलं जातं. तसेच आमिर खान व त्याची ‘दंगल’मधील को-स्टार अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या अफेअरच्याही खूप चर्चा रंगल्या होत्या. फातिमा आमिरपेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान आहे. या दोघांनी ‘दंगल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका केली होती. फातिमाला या विषयावरून बरंच ट्रोलही केलं गेलं होतं. मात्र, तिने किंवा आमिरने याबाबत कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.