आज (१० ऑक्टोबर रोजी) जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. आपल्या समाजात मानसिक आरोग्याबाबत फार बोललं जात नाही, परिणामी अनेक लोक तणावात जगतात. ते आपल्या व्यथा दुसऱ्यांसमोर मांडू शकत नाही आणि यातूनच आत्महत्येसारखे गंभीर प्रकार घडतात. आज या दिवसाचं औचित्य साधून आमिर खान व त्याची लेक आयरा यांनी एक महत्त्वाचा मेसेज दिला आहे.
अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “अशा उत्पादनांचं जाहीरपणे…”
आयराने वडिलांबरोबरचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात आमिर म्हणतो, “अवघड गणित शिकायचं असेल तर आपण शाळेत किंवा शिक्षकांकडे जातो, केस कापायचे असतील तर आपण सलूनमध्ये जातो. तिथे ती व्यक्ती आपले केस कापते, जिला ते काम चांगलं येतं. घरात फर्निचरचं काम असेल किंवा बाथरुममध्ये प्लम्बिंगचं काम असेल तर आपण त्या व्यक्तीकडे जातो जी त्यात निपुण आहे. आपण आजारी असू तर डॉक्टरकडे जातो. आयुष्यात खूप अशी कामं आहेत जी आपण स्वतः नाही करू शकत. ज्यासाठी आपल्याला दुसऱ्याची मदत लागते, ज्याला ते काम येतं. घरातल्या कामांसाठी दुसऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय आपण सहज घेतो.” पुढे आयरा म्हणते, “याचप्रमाणे जेव्हा आपल्याला मानसिक किंवा भावनिक मदतीची गरज भासते तेव्हा इतक्याच सहज, संकोच न करता आपण अशा व्यक्तीची मदत घ्यायला पाहिजे, जी त्या कामात निपुण आहे.”
आमिर मानसिक आरोग्याबद्दल म्हणाला, “मी आणि माझी मुलगी आयरा मागच्या अनेक वर्षांपासून थेरपीचा लाभ घेत आहोत. तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही मानसिक किंवा भावनिक समस्यांमधून जात आहात, काहीतरी चिंता किंवा नैराश्य आहे तर अशा प्रोफेशनल व्यक्तीला शोधा आणि मदत घ्या. कारण यात लाज वाटण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही.”