बॉलीवूडचे कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. अभिनेता आमिर खान(Aamir Khan) काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. १४ मार्चला अभिनेत्याने त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानच तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने उघड केले. इतकेच नव्हे, तर त्याने माध्यमांशी बोलताना त्याच्या गर्लफ्रेंडचीदेखील ओळख करून दिली. गौरी स्प्रॅट, असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव आहे. आता अभिनेत्याने याबद्दल खुलासा केल्यानंतर तो पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर सार्वजनिक ठिकणी दिसला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानाही दिसत आहे.

सोशल मीडियावर आमिर खान व गौरी स्प्रॅट यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वारिंदर चावला या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्या व्हिडीओमध्ये आमिर खान कुठेतरी जात आहे आणि तो गौरीची वाट पाहतोय. गौरी आल्यानंतर दोघेही कारमधून जात असल्याचे दिसत आहे. मीडियाशी संवाद साधताना गौरीने ती आमिर खानच्या प्रेमात का पडली, यावर वक्तव्य केले. गौरी म्हणाली, “प्रेमळ, काळजी घेणारा जेंटलमन पार्टनर किंवा जोडीदार मला हवा होता.” तर, आमिर खान म्हणाला, “गौरीबद्दल आमिर खानने म्हटले, “मी अशा जोडीदाराच्या शोधात होतो, जिच्याबरोबर मी शांतपणे राहू शकेन.”

गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळुरूची आहे. आमिर खान व गौरी स्प्रॅट हे दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात; पण ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुन्हा त्यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. इंडस्ट्रीबरोबर गौरीचा काहीही संबंध नसल्याचे आमिर खानने स्पष्ट केले. ती बंगळुरूमधील असून, ती हिंदी चित्रपट पाहत नाही. तिने माझे काही मोजकेच चित्रपट पाहिले असतील. ती माझ्याकडे सुपरस्टार म्हणून नाही, तर तिचा जोडीदार म्हणून बघते. पण, तिने ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला पाहिजे, असे मला वाटते, असे आमिर खानने म्हटले. तर गौरीने, आमिरचे दिल चाहता है व लगान हे दोनच चित्रपट पाहिले असल्याचा खुलासा केला.

दरम्यान, आमिर खानची याआधी दोन लग्ने झाली आहेत. आमिर खान व किरण राव यांनी २००५ मध्ये लग्नगाठ बांधली होती; मात्र त्यांनी २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगादेखील आहे आणि त्याचे नाव आझाद, असे आहे. किरण रावबरोबर आमिर खानचे हे दुसरे लग्न होते. याआधी त्याने रीना दत्ताबरोबर लग्न केले होते. १९८६ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती; मात्र २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना इरा खान व जुनैद खान, अशी दोन मुले आहेत. जुनैद खान सध्या बॉलीवूडमध्ये काम करीत आहे. सध्या आमिर खानच्या कामाबाबत बोलायचे, तर तो लवकरच सितारे जमीर पर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader