आमिर खानची मुख्य भूमिका असलेला २००८ मध्ये आलेला ‘गजनी’ हा सिनेमा आठवतो का ? काही तरी आठवतानाच या सिनेमातील नायकाला प्रचंड त्रास होतो, अशा आशयाची कथा असणारा चित्रपट. दर पंधरा मिनिटांनी यातला नायक गोष्टी विसरतो. गोष्टींची आठवण ठेवण्यासाठी अंगावर शत्रूचे नाव, मोबाइल नंबर सगळं गोंदवून घेतो. २००८ मध्ये हिंदीमध्ये आलेल्या या सिनेमाने बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक रेकोर्ड मोडले. आमिरचे सिक्स पॅक अॅप्स, विचित्र हेअर स्टाईल अशा गोष्टींमुळे हा सिनेमा आयकॉनिक सिनेमा झाला. आता याच सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे. या चित्रपटात मात्र एक ट्विस्ट असणार आहे. दोन नायक यात एकच भूमिका करणार आहेत.
ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पण हो, या सिनेमात दोन नायक भूमिका साकारणार आहेत. दोन्ही सिनेमांचं नावही एकच असणार आहे आणि दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. एकच सिनेमा, एकच कथा, मग पात्र दोन का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे भाषा.
हेही वाचा…लवकरच किशोर कुमार यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
‘गजनी २’ हा सिनेमा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, यात तामिळ भाषेत अभिनेता सूर्या दिसणार असून हिंदी भाषेत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. ‘गजनी’ हा सिनेमा २००५ मध्ये तामिळ भाषेत प्रदर्शित झाला होता; यात अभिनेता सूर्या आणि असिन मुख्य भूमिकेत होते, तर २००८ मध्ये हिंदीत प्रदर्शित झालेला ‘गजनी’ हा सिनेमा २००५ मध्ये आलेल्या सिनेमाचा सिक्वेल होता, यात आमिर खान मुख्य भूमिकेत होता.
अल्लू अरविंद यांचा ‘गजनी २’चा प्रस्ताव
‘गजनी २’बाबत सूर्या याने एका प्रमोशनल मुलाखतीत माहिती दिली. त्याचा नवीन चित्रपट ‘कंगुवा’च्या प्रमोशनदरम्यान त्याने खुलासा केला की, निर्माता अल्लू अरविंद यांनी गजनीच्या दुसऱ्या भागाची कल्पना मांडली.
सूर्या म्हणाला, “खरे तर अल्लू सरांनी खूप वर्षांनी हा प्रस्ताव ठेवला. मी त्यांना सांगितले की, हो नक्कीच, आपण विचार करू शकतो. चर्चा सुरू झाल्या आहेत, प्रक्रिया सुरू आहे, ‘गजनी २’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो.”
रिमेकचा शिक्का पुसावा म्हणून एकत्र शूटिंगचा निर्णय
पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार आमिर खान आणि सूर्या या दोघांनाही ‘गजनी २’ सिनेमा करण्याची इच्छा आहे, मात्र कुठल्याही एका भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होऊन त्याचा पुन्हा रिमेक व्हावा अशी दोन्ही अभिनेत्यांची इच्छा नाही. प्रसिद्ध प्रोड्यूसर्स अल्लू अरविंद आणि मधु मांटेना यांनी दोन्ही कलाकारांची चिंता लक्षात घेऊन ‘गजनी २’चे शूटिंग एकाच वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही चित्रपटांच्या वेळा एकच ठेवण्याचे प्रयोजन आहे, म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील, त्यामुळे रिमेकचा शिक्का लागणार नाही आणि प्रेक्षकांसाठी तो एक ताजातवाना अनुभव ठरेल.
२०२५ पर्यंत स्क्रिप्ट अंतिम करण्याचा मानस
‘गजनी २’ला केवळ एका सिक्वलच्या रूपात नव्हे, तर एक स्वतंत्र आणि नवी कथा म्हणून पुढे नेण्याचा विचार आहे. जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर २०२५ च्या मध्यावर स्क्रिप्ट तयार होईल आणि दोन्ही स्टार्सनी दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया पाहता, हा मोठा प्रोजेक्ट लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.