बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आता त्याने आपल्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटात आमीर अभिनय करताना दिसणार नसून तो या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटासाठी आमीरने सनी देओलबरोबर हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाचे नाव लाहोर १९४७ ठेवण्यात आले आहे. राजकुमार संतोषी याचे दिग्दर्शन करणार आहेत.
आमिर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाची घोषणा केली आहे. आमीरच्या प्रोडक्शन हाऊसने पोस्ट शेअर करत लिहिले “मी आणि AKP ची संपूर्ण टीम सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत लाहोर १९४७ या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आम्ही सनी आणि राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.”
राजकुमार संतोषी आणि सनी देओलने बॉक्स ऑफिसवर ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारखे तीन हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांचा अगामी चित्रपटही सुपरहिट ठरणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.
दरम्यान आमीर आणि सनी देओलला एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. अनेकदा या दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. १९९० साली आमीर खानचा ‘दिल’ आणि सनी देओलचा ‘घायल’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १९९६ मध्ये आमीरचा ‘राजा हिंदुस्थानी’ आणि सनीचा ‘घातक’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर समोरासमोर आले होते. त्यानंतर २००१ मध्ये आमीरचा ‘लगान’ आणि सनी देओलचा ‘गदर एक प्रेमकथा’ एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता.