Aamir Khan आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. तसंच नाना पाटेकर यांची ओळख एक हरहुन्नरी आणि वास्तववादी कलाकार म्हणून आहे. लवकरच हे दोघं एक चित्रपट करणार आहेत. म्हणजे त्यांनी तसं जाहीर तरी केलं आहे. आता तो कुठला चित्रपट असेल? त्याचं नाव काय या सगळ्या चर्चा अजून सुरु व्हायच्या आहेत. मात्र नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्या गप्पांच्या सत्रात आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना का जात नाही त्याचं कारण समोर आलं आहे.
आमिर आणि नाना पाटेकर यांच्या गप्पांची मैफल
आमिर खान आणि नाना पाटेकर या दोघांच्या गप्पांची मैफल झी म्युझिकच्या Candid Conversation या शोमध्ये रंगली होती. या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांचा चित्रपटांचा प्रवास उलगडला. नाना पाटेकर म्हणाले, “मी नाटकांतून कामं करायचो. त्यावेळी स्मिता पाटीलने मला सिनेमांत आणलं. मला स्मिताने सांगितलं होतं की नाटकांचा प्रेक्षक हा हजारोंच्या संख्येत असतो तर सिनेमा लाखो लोकांपर्यंत पोहचतो. तू सिनेमांत असलं पाहिजेस असं मला स्मिता म्हणाली होती तिच्या आग्रहामुळे मी सिनेमात आलो.”
आमिरनेही केलंय नाटकांतून काम
आमिर खान म्हणाला की मी महाविद्यालयात असताना नाटकांतून काम केलं आहे. मात्र नंतर मला चित्रपट हे माध्यम जास्त जवळचं वाटलं. त्यामुळे मी त्यातून भूमिका करु लागलो. मी काहीसा बेशिस्त आहे. जर माझ्याकडे काही काम नसेल तर मी बेशिस्तपणे वागतो, पण चित्रपट करायचा असेल तर मी सगळ्या वेळा पाळतो. आता मी दर वर्षाला एक चित्रपट करायचा असं ठरवलं आहे. तसंच इतक्या दिवसांमध्ये आई, पत्नी, मुलं यांना जो वेळ दिला नाही तो आता मी द्यायचं ठरवलं आहे. यानंतर गप्पा आल्या त्या पुरस्कारांवर याबाबत दोन्ही कलावंतांनी भाष्य केलं आहे. आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जात नाही याची कायमच चर्चा होते त्याचं कारण काय हे आता आमिर खाननेच उलगडलं आहे.
हे पण वाचा- बॉलिवूडच्या तिन्ही खानशिवाय भारतातले ‘हे’ अभिनेतेही एका चित्रपटासाठी १०० कोटींहून अधिक मानधन घेतात
पुरस्कार सोहळ्यात का जात नाही? आमिरनेच उलगडलं कारण
मी सुरुवातीला पुरस्कार सोहळ्यांना जायचो. पण मी नंतर जाणं बंद केलं असं आमिर खान म्हणाला. त्यावर नाना पाटेकरांनी विचारलं की तू पुरस्कार सोहळ्यांना का जात नाहीस? त्यावर आमिर म्हणाला, “आपण एका सर्जनशील क्षेत्रात काम करतो. आपण एखादा चित्रपट करतो म्हणजे ती काय टेनिसची मॅच नसते. बॉल रेषेच्या बाहेर गेला वगैरे नियम लावले. तसंच कुठलीही रेस नाही की हा पहिला आणि तो दुसरा आला. चित्रपटांमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला हा पहिला आला आणि तो दुसरा आला असं कसं काय ठरवू शकतो? मी ‘कयामत से कयामत’ तक सिनेमा केला तेव्हा तुम्ही ‘परिंदा’ चित्रपट केलात. आपल्या दोघांच्या भूमिकांची तुलना कशी काय होईल? आणखी एक मला वाटतं की आपण भारतीय लोक भावनिक खूप असतो. जेव्हा एखाद्याला पुरस्कार द्यायचा असतो तेव्हा आपण तो पुरस्कार व्यक्तीला देतो, त्याच्या कामाला देत नाही. खरंतर हे उलट असलं पाहिजे. पुरस्कार हा कुठल्या एका व्यक्तीला, त्याच्या नावामुळे नाही तर त्याच्या कामामुळे मिळाला पाहिजे. तर ती दाद देणं झालं. आपण आदर राखतो आणि म्हणतो की नाही यांना पुरस्कार दिला पाहिजे, त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. तसंच आपला वेळही महत्त्वाचा आहे. माझी पुरस्कार सोहळ्यांमध्ये जाण्याची रुची संपली आहे. त्यामुळे मी त्यात जात नाही. जे जातात, ज्यांना पुरस्कार मिळतात त्यांच्याविषयी मला पूर्ण आदर आहे. मात्र मला पुरस्कार सोहळ्यांत जायला मला आवडत नाही.” असं आमिर खान म्हणाला.
नाना पाटेकर पुरस्कार सोहळ्यांबाबत काय म्हणाले?
आमिरच्या उत्तरानंतर नाना पाटेकर म्हणाले, “माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. पुरस्कार देणारे जे ज्युरीज असतात सात-आठ लोक त्यांच्यापैकी चारपाच जणांशी माझा वाद झालेला असतो. त्यामुळे माझा कुणी विचारही करत नसावं” असं नाना पाटेकर यांनी हसत हसत सांगितलं.