बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. बिग बींनी स्पर्धकांबरोबर साधलेला संवाद अनेकदा चर्चेचा विषय असतो. बॉलीवूडचे कलाकारदेखील या शोमध्ये हजेरी लावताना दिसतात. आता या शोचा एक टीझर प्रदर्शित झाला असून, आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खानने या शोमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामधील अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यातील संवादाची चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

आमिर खान अमिताभ बच्चनसमोर बसला असून, तो बिग बींना विचारतो, “तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवत आहे का?”अमिताभ बच्चन म्हणतात, “३ जून १९७३” त्यावर आमिर खान म्हणतो, “सिद्ध करून दाखवा, पुरावा दाखवा”आमिर खानच्या या बोलण्यावर अमिताभ बच्चन क्षणभर गोंधळलेले दिसतात. आमिर खान म्हणतो, “माझ्याकडे पुरावे आहेत आणि माझ्याकडे तुमच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे.” पुढे तो म्हणतो, “तुमचा सर्वांत मोठा चाहता असल्याचा पुरावा मी तुम्हाला दिला आहे.” त्यावर अमिताभ बच्चन हसताना दिसत आहे. ११ ऑक्टोबरला हा एपिसोड रिलीज होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांचा हा जन्मदिवस आहे. हा बिग बींचा ८२ वा वाढदिवस आहे.

इन्स्टाग्राम

सोनी टीव्हीकडून हा प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आणखी एका टीझरमध्ये आमिर खान आणि जुनैद खान हे असे म्हणताना दिसत आहेत की, आम्ही अमिताभ बच्चन यांना सरप्राइज द्यायला चाललोय. त्यांना माहीत नाही की, आम्ही कार्यक्रमात येत आहोत. आमिर खान अमिताभ बच्चन यांचे अनेकदा कौतुक करताना दिसतो. त्याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलताना म्हटले होते, “एका सीनसाठी ते किती सराव करतात, हे मी पाहिले आहे.”

हेही वाचा: “खेळ अजून संपलेला नाही”! Bigg Boss Marathi मध्ये परतणार रितेश देशमुख; म्हणाला, “या सीझनचा सर्वात मोठा धक्का…”

आमिर आणि अमिताभ बच्चन यांनी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदूस्तान’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ३०० कोटींचे बजेट असूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरण्यात अयशस्वी ठरला होता. अमिताभ बच्चन नुकतेच ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, मृणाल ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.

बिग बी लवकरच रजनीकांत यांच्याबरोबर ‘वेट्टैयन’ या चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan ask proof of wedding date of amitabh bachchan and jaya bachchan bigg b puzzled nsp