२०२२ मध्ये आमिर खानने चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून कमबॅक केलं. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल अशी अपेक्षा निर्मात्यांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना होती पण तसं काहीच झालं नाही. बऱ्याच लोकांनी चित्रपटाला बॉयकॉट केलं. आमिर खान आणि करीना कपूर यांची काही जुनी वक्तव्यं चित्रपटाच्या अपयशाला कारणीभूत ठरली. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले.
एवढेच नाही तर आमिरचा हा चित्रपट परदेशातही कमाल दाखवू शकला नाही. १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ने केवळ ३८.०५ कोटींची कमाई केली आहे. नुकतंच आमिरचा चुलत भाऊ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक मन्सूर खान यांनीही या चित्रपटातील आमिरच्या ओव्हरअॅक्टिंगबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर एसएस राजामौली यांनीही आमिरने ओव्हर अॅक्टिंग केल्याचं म्हंटलं असल्याचं आमिरने निदर्शनास आणून दिल्याचीही त्यांनी आठवण सांगितली.
आणखी वाचा : जेव्हा भर कार्यक्रमात अश्लील हावभाव करत शाहरुखने प्रियांका चोप्राला घातलेली लग्नासाठी मागणी अन्…
‘पीटीआय’शी संवाद साधताना मन्सूर खान म्हणाले, “आमिरची विनोदबुद्धी फारच उत्तम आहे, जेव्हा मी त्याच्या चित्रपटातील अभिनयाबद्दल तक्रार केली तेव्हा त्याने ते फारसं मनावर घेतलं नाही, पण जेव्हा हीच गोष्ट एसएस राजामौली यांनी म्हंटल्याचं त्याला समजलं तेव्हा तो म्हणाला की खरंच या माणसालाही तसंच वाटत असेल तर मी कदाचित ओव्हर अॅक्टिंग केलीच असू शकते.”
पुढे मन्सूर खान म्हणाले, “मला लाल सिंगची कथा आवडली होती, अतुल कुलकर्णीने फार अभ्यास करून आणि अत्यंत बारकाईने ही कथा सादर केली होती. आमिर खानचे गरजेपेक्षा जास्त हावभाव आणि ओव्हर अॅक्टिंग हे मात्र मला यात खटकल्याचं मी आमिरलाही सांगितलं. लाल सिंगचं पात्र मूर्ख नव्हतं किंवा त्याला कोणता विशेष आजारही नव्हता तो फक्त इतरांपेक्षा जरा वेगळा आहे. मला मूळ चित्रपटातील टॉम हँक्सचं काम प्रचंड आवडलं होतं.”
आणखी वाचा : महाभारतावर चित्रपट बनवण्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांचं मोठं विधान; म्हणाले, “मी यावर गांभीर्याने…”
‘लाल सिंग चड्ढा’चं अपयश हा आमिरसाठी खूप मोठा सेटबॅक असल्याचंही मन्सूर यांनी कबूल केलं. आमिर हा अत्यंत मेहनती कलाकार आहे या चित्रपटाच्या अपयशामुळे तो नक्कीच दुखावला गेला असल्याचंही त्यांनी सांगितलं. मन्सूर यांनी आमिर खानच्या ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ अशा चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं होतं.