Aamir Khan : आमिर खान सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यादरम्यान, त्याने नव्या गर्लफ्रेंडबाबत खुलासा केला. सध्या बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. याआधी त्याचा दोन वेळा घटस्फोट झालेला आहे. आमिरचं पहिलं लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताशी झालं होतं. लग्नानंतर जवळपास १६ वर्षांनी म्हणजेच २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला होता.
पहिला घटस्फोट झाल्यावर आमिर खूप दारू पिऊ लागला होता. त्या दीड वर्षात अभिनेता त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करू शकला नाही, दररोज रात्री मद्यपान करायचा असं आमिरने इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधताना सांगितलं आहे.
आमिर या मुलाखतीत म्हणाला, “मी आणि रीना जेव्हा वेगळे झालो तेव्हा जवळपास २ ते ३ वर्षे मी तणावात होतो. मी काम करत नव्हतो, कोणत्याही स्क्रिप्ट ऐकल्या नाहीत. घरी एकटाच असल्याने त्या काळात खूप मद्यपान करायचो. दीड वर्षे मी एकटा राहत होतो, तुम्हाला आज ऐकून धक्का बसेल पण, एका दिवसात मी एक बाटली दारू पिऊ लागलो. त्याआधी मी अजिबात मद्यपान करायचो नाही. मी अगदी ‘देवदास’सारखा वागत होतो, जो स्वत:लाच नष्ट करू पाहत होता. तेव्हा प्रचंड नैराश्य आलं होतं.”
“आपल्या केलेल्या चुकांना आपल्यालाच स्वत:चं सामोरं जावं लागतं. एकेकाळी जे आपले खास होते ते आता आपले राहिले नाहीत, हे वास्तव स्वीकारावं लागतं. जेव्हा ती माणसं तुमच्याबरोबर होती तेव्हा किती चांगली होती हे देखील स्वीकारलं पाहिजे.” असं आमिरने यावेळी सांगितलं.
दरम्यान, आमिरने बॉलीवूडमध्ये वाटचाल सुरू केली असताना रीनाबरोबर गुपचूप लग्न केलं होतं. या जोडप्याने एकत्र १६ वर्षे संसार केला. यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुलं आहेत. २००२ मध्ये रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं. यांचाही घटस्फोट झाला. अलीकडेच त्याच्या ६० व्या वाढदिवशी, आमिरने त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रॅटशी मीडियाला ओळख करून दिली. गौरीबरोबर आता ‘सेटल’ वाटत असल्याचं तो म्हणाला. तसेच आता मद्यपान करत नसल्याचंही आमिरने सांगितलं.