Aamir Khan Girlfriend Gauri Spratt : अभिनेता आमिर खानने आज (१३ मार्च) माध्यमांबरोबर त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला. त्याने या सेलिब्रेशनमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. आमिर खानने प्रेमाची कबुली दिली असून त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे.

दोन वेळा घटस्फोटित असलेला आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. तो त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला डेट करतोय. तिचं नाव गौरी आहे. आमिर व गौरी एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. गौरी व आमिर वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. गौरीबरोबरच्या नात्यात आनंदी असल्याचं आमिर खानने म्हटलं आहे.

कोण आहे गौरी?

आमिर खान व गौरी वर्षभरापासून डेट करत आहेत. आमिरची गर्लफ्रेंड गौरी मूळची बेंगळुरूची आहे. ती सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे. गौरीला एक मुलगा आहे. तो सहा वर्षांचा आहे. गौरीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर तिचा व तिच्या मुलाचा फोटो पाहायला मिळतो. गौरी ही तमिळ व आयरिश असून तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते.

गौरीबद्दल काय म्हणाला आमिर खान?

आमिर म्हणाला, “गौरी आणि माझी भेट २५ वर्षांपूर्वी झाली होती आणि आता आम्ही पार्टनर्स आहोत. आम्ही एकमेकांबद्दल खूप गंभीर आहोत आणि कमिटेड आहोत. आम्ही दीड वर्षांपासून एकत्र आहोत.” आमिरने गौरीसाठी ‘कभी कभी मेरे दिल में..’ हे गाणंही गायलं.

आमिरने सलमान-शाहरुखशी करून दिली गौरीची ओळख

आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड गौरीची ओळख इंडस्ट्रीतील त्याच्या दोन खास मित्रांना करून दिल्याचं सांगितलं. शाहरुख खान सलमान खान बुधवारी रात्री आमिर खानच्या घरी गेले होते. त्यावेळी त्याने गर्लफ्रेंड गौरीची ओळख त्यांच्याशी करून दिली.

लग्नाबद्दल काय म्हणाला आमिर खान?

गर्लफ्रेंडची ओळख करून दिल्यावर आमिर खान लग्नाबद्दल म्हणाला, “वयाच्या ६० व्या वर्षी मला लग्न करणं शोभतं की नाही हे माहीत नाही. पण माझी मुलं खूप आनंदी आहेत. माझं माझ्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींबरोबर खूप चांगलं नातं आहे, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”

आमिरने सांगितलं की त्याची मुलं आणि कुटुंबीय गौरीला भेटले आहेत आणि ते या दोघांच्या नात्याबद्दल आनंदी आहे. आमिर २००१ मधील सुपरहिट चित्रपट ‘लगान’चा संदर्भ देत म्हणाला, “भुवनला अखेर त्याची गौरी भेटली.”