Laapataa Ladies Oscar 2025 : किरण रावने (Kiran rao) दिग्दर्शित केलेल्या ‘लापता लेडीज’ या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, तसेच समीक्षकांनीही या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा सिनेमा यावर्षी भारताकडून अधिकृतपणे ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. किरण रावच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार झाला असून, आमिर खानने (aamir khan) या सिनेमाची निर्मिती केली आहे. किरण रावने हा निर्णय ऐकून “मी खूप आनंदी आहे” अशी प्रतिक्रिया दिली. आता आमिर खानने सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय (विदेशी) चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळालं आहे. यावर आमिर खान प्रोडक्शनकडून सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट करण्यात आली आहे. यात आमिर खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…Laapataa Ladies : किरण रावची स्वप्नपूर्ती! भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट; २९ चित्रपटांमधून निवड
काय म्हणाला आमिर?
‘लापता लेडीज’ला ऑस्करसाठी पाठवल्याबद्दल आमिरने ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे आभार मानले आहेत. आमिर म्हणतो, “मी ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’चे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या ‘लापता लेडीज’ या सिनेमाची निवड करत आमच्या सिनेमाला ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. मी आमच्या प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे ‘लापता लेडीज’ला दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार मानतो.” त्याने जिओ स्टुडिओज आणि नेटफ्लिक्सचे सुद्धा आभार मानले आहेत.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 23, 2024
किरण रावने मानले आभार
किरण आनंद व्यक्त करत म्हणाली, “आमचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेल्याचा मला खूप आनंद आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश मिळालं आहे.”
हेही वाचा…१.६ कोटींची कमाई करणारा ‘हा’ होता बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा, तुम्ही पाहिलाय का?
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 23, 2024
आमिर खान प्रोडक्शनचा तिसरा सिनेमा ऑस्करला
‘लापता लेडीज’ हा भारताकडून ऑस्करला जाणारा आमिर खान प्रोडक्शनचा तिसरा सिनेमा आहे. याआधी २००७ मध्ये आलेला ‘तारे जमीन पर’ हा सिनेमा भारताकडून त्या वर्षी अधिकृतपणे ऑस्करला पाठवण्यात आला होता. तर त्याआधी मराठमोळे आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि आमिर खानने निर्मिती केलेला ‘लगान’(२००१) हा सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. ‘लगान’ हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याने ७४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, म्हणजेच ऑस्करमध्ये (२००२), पहिल्या पाच नामांकीत चित्रपटांमध्ये स्थान मिळवलं होतं.