Aamir Khan on Offensive Comedy : सध्या मनोरंजन विश्वात रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रसिद्ध यूट्यूबर समय रैनाच्या शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सर्वच स्तरांतून रणवीरवर संताप व्यक्त करण्यात आला. रणवीरने या प्रकरणी माफी मागितली आहे. मात्र, अद्यापही सोशल मीडियावर विविध कलाकार त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशात या सर्व प्रकरणात बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.
आमिर खानच्या व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडीओमध्ये त्यानं नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बोलताना त्यानं यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं होतं. “मी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्णत: विश्वास ठेवतो, यात काहीच वाद नाही. मात्र, आपल्या प्रत्येकावर एक जबाबदारी आहे हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. हिंसा ही फक्त शारीरिक नसते. हिंसा ही मौखिक आणि भावनात्मकसुद्धा असते. जेव्हा तुम्ही कुणाचा अपमान करता तेव्हा तुम्ही हिंसा करीत असता”, असं आमिर खान या व्हिडीओत म्हणाला होता.
शिव्या दिल्याने कोणी प्रभावित होत नाही…
आमिरनं पुढे शिवीगाळ करत विनोद करण्यावर वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता, “जेव्हा तुम्ही २५ शिव्या देता आणि तुम्हाला वाटतं की, असं केल्यानं मी समोरच्या व्यक्तीवर माझा प्रभाव टाकू शकेन, त्याला इम्प्रेस करू शकेन, तर शिव्यांमुळे प्रभावित होण्याचं सध्या माझं वय नाही. त्या वयातून मी तर पुढे आलो आहे.”
“मी आता १४ वर्षांचा लहान मुलगा राहिलेलो नाही, जो शिव्या ऐकून हसू लागेल. मी चुकीच्या शब्दांनी अजिबात प्रभावित होत नाही. जर तुम्हाला मला हसवायचं असेल, तर कुणाच्याही भावनांना ठेच न पोहोचवता ते केलं पाहिजे”, असं आमिर खान या व्हिडीओमध्ये म्हणाला होता.
रणवीर अलाहाबादियाप्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं?
रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याचे यूट्यूबवर अनेक चॅनेल्स आहेत. त्यातील ‘बीरबायसेप्स’ या चॅनेलसाठी त्याल खास ओळखलं जातं. रणवीरनं समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्याच्यावर सर्वांनी टिकास्त्र डागलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला.
पुढे रणवीरनं या प्रकरणी जाहीर माफी मागितली. मात्र, हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. संबंधित अक्षेपार्ह व्हिडीओ हटवण्यासाठी NHRC ने यूट्यूबला नोटीस पाठवली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाकडून या प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, सौरभ बोथरा यांना १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर राहावं लागणार आहे. त्यासह गुवाहाटी पोलिसांनी आणि महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.