आमिर खान(Aamir khan)ची प्रमुख भूमिका असलेला दंगल हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करत विक्रम रचला होता. या गीता फोगाट, बबिता फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आमिर खानची या चित्रपटातील भूमिकादेखील लोकप्रिय ठरली होती. नितेश तिवारी यांनी दंगल चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याने दंगल चित्रपटातील त्याच्या भूमिकेला सुरूवातीला नकार दिला होता, असा खुलासा केला आहे.
सलमान आणि शाहरूख खानने…
आमिर खानने नुकतीच जस्ट टू फिल्मी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, “दंगल चित्रपटाच्या आधी मी धूम ३ मध्ये काम करत होतो. त्यामध्ये मी चांगला दिसणे, वजन कमी असणे आवश्यक होते. त्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे मी कमी वयाचा दिसत होतो. दंगल चित्रपटाचा निर्माता नितेश माझ्याकडे ही भूमिका घेऊन आला. त्यावेळी मी त्याला सांगितले की ही चांगली गोष्ट आहे. पण आताच मी धूम ३ साठी वजन कमी केले आहे आणि त्यामुळे खूप तंदुरूस्त दिसत आहे आणि आता मी ५५ वर्षीय चार मुलींच्या वडिलांची भूमिका करावी असे तुम्हाला का वाटते?”
आमिर या भूमिकेचा असा विचार करायचा की शाहरूख व सलमान खानला असे वाटते की एका म्हाताऱ्या माणसाची भूमिका मी करावी. आमिर खान म्हणाला, “मी नितेशला गंमतीने म्हणालो की मला वाटते की सलमान आणि शाहरूख खानने तुम्हाला पाठविले आहे आणि सांगितले आहे की याला ६० वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका द्या आणि याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढा.”
आमिर खान पुढे म्हणाला, “मला तो चित्रपट करायचा नव्हता कारण मी खूपच तरूण दिसत होतो. मी नितेशजींना सांगितले की हा चित्रपट १०-१५ वर्षांनी बनवा. विशेष बाब म्हणजे त्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण त्यांना त्या भूमिकेसाठी मलाच कास्ट करायचे होते. मग मात्र मी नितेशजींना म्हणालो की आपण हा चित्रपट बनवूयात. पुढे जे होईल ते बघता येईल.”
जर दंगल चित्रपटात चार मुलींच्या वडिलांची भूमिका साकारली तर माझे खरे वय प्रेक्षकांसमोर येईल अशी भीती आमिर खानला वाटत होती. याबद्दल आमिर खान म्हणाला, “त्यावेळी माझं खरं वय हे ५५ वर्ष होतं. त्यामुळे लोकांना वाटेल की दंगलमधील आमिर खान खरा आहे. धूम ३ मधील आमिर खान खरा वाटणार नाही. त्यामुळे मला ती भूमिका साकारण्यासाठी थोडे अवघडलेपण होते. कारण भूमिकेचे वय माझ्या वयाइतकेच होते.”
आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.