बॉलीवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच त्याने त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटची माध्यमांसमोर ओळख करुन दिली करून दिली. यामुळे तो चांगलाच लाईमलाइटमध्ये आहे. हे दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. पण त्यांचे प्रेमसंबंध गेल्या दीड वर्षापूर्वी सुरू झाले. यामुळे आता आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सहकलाकारांबरोबरच्या पूर्वीच्या संबंधांबद्दलच्या चर्चांनीही जोर धरला आहे.
आमिरचे त्याच्या महिला सहकलाकारांशी अनेकदा नाव जोडले गेले आहे. लेहरेनला दिलेल्या जुन्या मुलाखतीत त्याने या अफवांबद्दल उघडपणे भाष्य केले होते. याबद्दल तो म्हणालेला की, “माझं माधुरीशी (Madhuri Dixit) अफेअर आहे, हे वृत्तांमध्ये आलं आहे. माझं जुहीशी (Juhi Chawla) अफेअर आहे, हेही आलंय. मी पूजा भट्टला लग्नाची मागणी घातली होती, हेही आलं आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी बातम्यांमधून आल्या आहेत. पण त्याचा काही परिणाम होत नाही.”
गेल्या काही वर्षांत त्याच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. परंतु, याबद्दल त्याने अनेकदा शांत आणि संयमाने भाष्य केलं आहे. १९८६ मध्ये आमिरने रीना दत्ताशी लग्न केलं. त्यानंतर दोघे जुनैद आणि आयरा या दोन मुलांचे पालक झाले. मात्र त्यांचं हे नातं २००२ मध्ये संपलं. मग २००५ मध्ये आमिरने चित्रपट निर्माती, दिग्दर्शक किरण रावशी लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांनी आझादला जन्म दिला. २०२१ मध्ये आमिर-किरण वेगळे झाले. पण ते त्यांच्या मुलाचे सहपालक आहेत आणि व्यावसायिकरित्या एकत्र कामही करत आहेत.

सहकलाकार व अभिनेत्रींबरोबरच्या नात्याबद्दल अनेक अफवा असल्या तरीही आमिरने नेहमीच आपल्या सहकलाकारांबरोबरचे संबंध राखले आहेत. त्याने ‘कयामत से कयामत तक’मध्ये जुही चावला, ‘दिल’मध्ये माधुरी दीक्षित आणि ‘दिल है के मानता नहीं’ मध्ये पूजा भट्टबरोबर काम केले आहे. दरम्यान वयाच्या साठाव्या वर्षी आमिरने आपल्या नव्या प्रेमाची कबुली दिल्याने सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दरम्यान, आमिर खानची ही नवीन प्रेयसी गौरी स्प्रॅट विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. काही वृत्तांनुसार, गौरीला सहा वर्षांचा एक मुलगादेखील आहे. सध्या ती आपल्या मुलासह बेंगळुरूमध्ये राहते. गौरी एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. आमीरच्या मते, त्याच्या कुटुंबातील सर्वजण गौरीबद्दल आनंदी आहेत.