२००९ साली ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातली गाणी संवाद चित्रपटाची कथा हे सर्वच सुपरहिट ठरलं. यासोबतच कौतुक झालं ते आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पडद्यावरील मैत्रीचं. आता हे तिघं पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसले. त्यांना एकत्र पाहून आता ‘थ्री इडियट्स’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.
आमिर खान सोशल मीडियावर सक्रिय नसला तरीही शर्मन जोशी आणि आर माधवन सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांची शेअर करत असतात. आता शर्मन जोशीने त्याचा आमिर खान आणि आर माधवनबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शर्मनने शेअर केलेल्या व्हिडीओत हे तिघं एका स्टेडियममध्ये उभे असलेले दिसत आहेत. त्यांना पाहून आता ते ‘थ्री इडियट्स’च्या पुढील भागाची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे तिघे एकत्र आले होते. व्हिडीओच्या सुरुवातीला शर्मनने त्याचा आगामी गुजराती चित्रपट ‘काँग्रॅज्युलेशन’बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आर माधवन त्याच्याकडे येतो आणि त्याच्या चित्रपटाबद्दल विचारतो. त्यानंतर, शर्मन पुन्हा त्याच्या चित्रपटाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र आमिर खान त्यात व्यत्यय आणतो. नंतर आमिर आणि आर माधवन दोघंही चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल गोंधळले दिसून येतात. मग अखेर शर्मन कंटाळून कॅमेरा बाजूला घेऊन जातो.
आता त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वेलची मागणी करत आहेत. तर अनेकांनी त्या तिघांना पुन्हा एकदा एकत्र पाहून आनंद झाला असं कमेंट करत म्हटलं.