बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा ‘लवयापा’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. व्हॅलेटाइन डेचं औचित्य साधून जुनैदचा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात जुनैदसह दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर पाहायला मिळाली होती. पण, जुनैद व खुशीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. यावर आता आमिर खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘इन्स्टंट बॉलीवूड’शी संवाद साधताना आमिर खानला जुनैद खानच्या करिअरबाबत विचारलं. त्यावर आमिर कान म्हणाला, “जुनैदने हिंदी सिनेसृष्टीत जबरदस्त सुरुवात केली आहे. तो खूप टॅलेंटेड आहे. जुनैद जी काही भूमिका करतो, त्यात तो रमून जातो. त्याने ‘महाराजा’ आणि ‘लवयापा’ चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे.”

पुढे जुनैदबद्दल आमिर खान म्हणाला की, तो माझ्यासारखा आहे. तो चांगला डान्सर नाहीये. तसंच तो इतर लोकांशी संवाद साधताना थोडा घाबरतो. मुलाखतींमध्येही तो काहीही उत्तरं देतो. पण, जुनैद खूप शिकेल आणि खूप चांगलं काम करेल. त्यानंतर जुनैदचा चित्रपट फ्लॉप होण्याविषयी आमिर खान म्हणाला, “त्याचा ‘लवयापा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. हे एकप्रकारे चांगलं झालं. यामुळे तो जास्त स्ट्राँग होईल आणि मेहनत करण्यासाठी अधिक प्रेरित होईल. जुनैद सध्या योग्य मार्गावर आहे.”

‘लवयापा’ चित्रपटाची कथा?

‘लवयापा’ चित्रपटात एक कपल दाखवण्यात आलं आहे, जे आपासात फोन बदलण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर बरेच खुलासे होतात. जे एका बाजूला धक्कादायक असतात. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. ‘लवयापा’ चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर व्यतिरिक्त आशुतोष राणा, किकू शारदा यांनी खूपच चांगलं काम केलं आहे.

दरम्यान, जुनैद खानने ‘महाराजा’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याचा ‘लवयापा’ चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच जुनैद दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीबरोबर झळकणार आहे. ‘एक दिन’ असं चित्रपटाचं नाव असून यामध्ये प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्येच या चित्रपटाचं जपानमधील चित्रीकरण पूर्ण झालं होतं. आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साई पल्लवी ‘एक दिन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Story img Loader