किरण राव आणि आमिर खान पुन्हा एकदा ‘लापता लेडीज’ चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. या वर्षी मार्चमध्ये रिलीज होणारा हा चित्रपट टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. १५ वर्षांच्या संसारानंतर आमिर आणि किरण २०२१ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर एकत्र काम करण्याबाबत विचारले असता आमिर म्हणाला की, तो व किरण अजूनही भावनिकरित्या एकमेकांशी जोडलेले आहेत.
‘न्यूज १८ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत या जोडप्याला घटस्फोटानंतर एकत्र काम करण्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर घटस्फोट झाल्यावर तुम्ही एकमेकांचे शत्रू होता, असं कोणत्या डॉक्टरने म्हटलं आहे का? असा प्रश्न केला. “मी स्वतःला भाग्यवान समजतो की किरण माझ्या आयुष्यात आली. आमचा एकत्र प्रवास खूप चांगला होता. आम्ही वैयक्तिक व व्यावसायिक खूप गोष्टी एकत्र केल्या. आम्ही भावनिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले आहोत आणि नेहमीच राहू. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत,” असं आमिर म्हणाला.
आमिरने किरणचे कौतुक केले आणि म्हणाला, “मला वाटतं किरण खूप चांगल्या मनाची आणि खूप हुशार आहे. ती कधी कधी माझ्यावर ओरडते, पण मला चांगलं वाटतं. आम्ही एकत्र करत असलेल्या कामाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत.” किरणनेही आमिरशी सहमती दर्शवली आणि पुढे म्हणाली की, “आम्हाला एकमेकांबरोबर काम करायला चांगलं वाटतं.”
किरण आणि आमिरने २०२१ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे, ते पालक म्हणून मुलाचा एकत्र सांभाळ करतात. आमिर खानने किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. नुकतंच आमिर खानची मुलगी आयरा खानचं लग्न थाटामाटात पार पडलं. या लग्नाला किरण रावनेही हजेरी लावली होती.
दरम्यान, ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ५ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहिली आहे.