बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता मुलगा जुनैद खानमुळे मोठ्या चर्चेत होता. जुनैद खानने नुकतेच ‘महाराज’ या चित्रपटातून पदार्पण केले आहे. आता आमिर खानने एका मुलाखतीत, जुनैदच्या पदार्पणाबाबत खूप तणावात होतो, असे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला आमिर खान?
‘न्यूज १८’ बरोबर संवाद साधताना आमिर खानने जुनैदच्या पदार्पणाबाबत वक्तव्य केले आहे. तो म्हणतो की, जेव्हा जुनैद बॉलीवूडमध्ये पदार्पण करत होता. त्यावेळी मी खूप तणावात होतो. लोकांना त्याचे काम आवडेल की नाही, माहित नव्हते. पण त्याने स्वत:वर खूप मेहनत घेतली आहे. त्याने कधीच माझ्याकडून कसलीच मदत घेतली नाही. मला खूप गर्व वाटतो आणि आनंद होतो की, सगळ्या गोष्टी त्याने स्वत:च्या मेहनतीवर केल्या, सगळ्यांना ते माहित आहे. आणखी एका मुलाखतीत आमिरने जुनैदचे कौतुक करताना म्हटले आहे की, त्याने सुरुवातीलाच वेगळे कथानक निवडले, लोकांना त्याची भूमिका आवडली. लोक ज्याप्रकारे त्याला पाठिंबा देत आहेत, ही खरंच चांगली सुरुवात आहे. त्याने माझ्याशिवाय सगळ्या गोष्टी केल्या आहेत. हा चित्रपट मिळवण्यासाठीदेखील त्याने स्क्रीन टेस्ट दिली आहे. स्वत:च्या हिंमतीवर त्याने चित्रपट केला आहे. माझ्या त्याला शुभेच्छा आहेत.
जुनैद खानने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कुटुंबाविषयी भाष्य केले होते. त्याने म्हटले होते की, माझ्या वडिलांनी म्हणजेच आमिरने करिअरच्या बाबतीत मला कायमच पाठिंबा दिला आहे. कधीही त्यांनी ढवळाढवळ केली नाही. त्यांचे मत, निर्णय कधीही आम्हा मुलांवर थोपवले नाहीत. चित्रपटांबाबतील ते कोणत्याही प्रश्नाचे ते सहज उत्तर देऊ शकतात. जेव्हा अपयश येते तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्यावर होतोच पण त्या अपयशाचा स्वीकार करण्यासाठी ते काही वेळ घेतात आणि त्यानंतर कुठे चुकलं यावर विचार करतात.
आईबद्दल बोलताना त्याने म्हटले होते की, माझ्या व्यक्तीमत्वाला आकार आईने दिला आहे. तिचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम आहे. तीने मला मोठे केले आहे. वडील प्रेमळ आहेत पण ते त्यांच्या आयुष्यात व्यग्र होते. तर मला कोणी जर वाढवले असेल, तर ती माझी आई आहे. पण जर मी कोणत्या अडचणीत असेल, तर मी आई, वडील किंवा इराला फोन करतो आणि ते सगळे माझ्यासाठी असतात. माझे वडीलदेखील त्यांच्या कामात कितीही व्यग्र असतानादेखील मला जर त्यांची गरज असेल तितका वेळ ते मला देतात. माझ्याकडे मला कायम पाठिंबा देणारे कुटुंब आहे. असे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने म्हटले होते.
दरम्यान, जुनैद खानने ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. जुनैद खानने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. आता जुनैद साई पल्लवीबरोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.