Aamir khan On Laapta Ladies : आमिर खान हा बॉलीवूडमधील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो, पण त्यालाही कधी कधी अपेक्षित भूमिका मिळत नाहीत. आमिर खानने अलीकडेच त्याला किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटात पोलीस उपनिरीक्षक श्याम मनोहरची भूमिका साकारण्याची इच्छा होती असे सांगितले. मात्र, ही भूमिका रवि किशनने साकारली.
‘एशियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान किरण रावने आमिरला या भूमिकेसाठी का नकार दिला , यावर सविस्तर भाष्य केले. तर याच फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमिरने या भूमिकेसंदर्भांत किरण राववर एक आरोप केला.
आमिरचा अभिनय तपासला पण…
आमिर म्हणाला, “मी या चित्रपटात पोलिसाच्या पात्रासाठी स्क्रीन टेस्ट दिली होती, पण किरणने मला ती भूमिका साकारू दिली नाही. मला पोलिसाची भूमिका करायची होती. मी खूप उत्सुक होतो, माझ्या स्क्रीन टेस्टही चांगल्या झाल्या होत्या. पण माझी या भूमिकेसाठी निवड झाली नाही. यानंतर किरण आणि मी चर्चा करून रवि किशन यांना कास्ट करण्याचा निर्णय घेतला.”
किरण रावचे स्पष्टीकरण
किरण रावने आपल्या भूमिकेच्या निवडीबद्दल सांगितले, “आमिरची स्क्रीन टेस्ट उत्तम झाली होती आणि त्याला ही भूमिका करण्याची खूप इच्छा होती. पण मला वाटलं की, त्याच्या उपस्थितीमुळे चित्रपटाचे संतुलन बिघडलं असतं. या पात्राचा शेवटपर्यंत ग्रे शेड राहतो आणि शेवटी त्याची एक सहानुभूतीपूर्ण बाजू प्रेक्षकांसमोर येते. मात्र, आमिरसारखा लोकप्रिय अभिनेता ही भूमिका साकारताना प्रेक्षकांना आधीच अंदाज आला असता की, शेवटी त्याच्यात बदल होणार.”
आमिरचा विनोदी अंदाज
किरणच्या स्पष्टीकरणावर आमिरने आपल्या खास शैलीत हसत प्रतिक्रिया दिली तो म्हणाला, “किरणला माझ्या अभिनयावर विश्वासच नव्हता. तिला वाटले की, मी प्रेक्षकांना माझा ग्रे शेड पटवून देऊ शकणार नाही. यामुळे तिने माझी या भूमिकेसाठी निवड केली नाही. “
‘लापता लेडीज’ची यशस्वी घौडदौड
‘लापता लेडीज’ हा चित्रपट सुरुवातीला फारसा चालला नाही, पण चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांच्या भावनांशी जोडले गेल्यामुळे हळूहळू ‘लापता लेडीज’ ने यश मिळवले. या चित्रपटाची २०२५ च्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतरित्या निवड करण्यात आली. आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात नितांशि गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवि किशन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.