Aamir Khan Gauri Relationship : आमिर खानचा आज ६० वा वाढदिवस आहे. आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी चाहत्यांबरोबर एक खास बातमी शेअर केली. आमिरने सांगितलं की तो रिलेशनशिपमध्ये आहे. आमिर दुसऱ्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी असून तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. आमिरच्या या नव्या नात्याची सगळीकडे खूप चर्चा आहे. आमिरची बहीण अभिनेत्री निखत खानने आमिर व गौरीच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच आमिरबरोबरच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या.

निखत गौरी आणि भाऊ आमिरच्या नात्याबद्दल म्हणाली, “मला त्या दोघांसाठी चांगलं वाटतंय आणि त्यांचं नेहमी चांगलं व्हावं अशी आशा मी व्यक्त करते. आमिर ६० वर्षांचा झाला यावर विश्वास बसत नाही. आमचं सर्वांचं वय वाढतंय. साहजिकच त्याचंही वय वाढतंय; पण, जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा अनेक चांगल्या आठवणी डोळ्यासमोर येतात.”

आमिर खानचा स्वभाव कसा होता?

निखत पुढे म्हणाली, “मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा आमिर व फैजल युनिफॉर्ममध्ये शाळेत जायचे. एके दिवशी अम्मा म्हणाली की, घरी गाडी असल्याने त्यांनी गाडीने शाळेत जावं.” निखतने ती गाडी चालवायली शिकली तेव्हाची आठवण सांगितली. “मला आठवतं की मी गाडी चालवायला शिकले. कार पडून होती ते पाहून मी चालवायचं ठरवलं. कोण सर्वात आधी जाऊन गाडी चालवेल, यासाठी आमच्यात स्पर्धा असायची. आमिर हुशार होता. त्याला चावी सापडली आणि मी ड्रायव्हर सीटवर जाऊन बसले. आम्ही २०-३० मिनिटं तसेच बसलो. आमिर हट्टी होता आणि तो तिथेच बसून राहिला,” असं निखतने सांगितलं. शेवटची निखतने हार मानली आणि ड्रायव्हर सीट आमिरला दिली.

आमिरच्या करिअरबद्दल निखत म्हणाली…

“आमिरच्या करिअरच्या सुरुवातीला चाहत्यांचे फोन यायचे, ती खूप छान भावना होती. आम्हाला आमच्या भावाचा अभिमान होता. पण जसजसे फोन वाढले, रात्री उशिरा फोन यायचे त्यामुळे आमची काळजी वाढली. घरातील सगळे जागे असायचे. त्याचा प्रवास अप्रतिम होता. मी नेहमी म्हणते की भाऊ असावा तर असा. आमिर आम्हाला तुझा खूप अभिमान आहे,” असं निखत म्हणाली.

आमिरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.