Nupur Shikhare Dance Video : बॉलीवूड सेलिब्रिटींचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. नुपूर हा आमिर खानचा जावई आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात आयरा व नुपूर यांनी लग्नगाठ बांधली होती. या दोघांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. नुपूर शिखरे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरबरोबरच उत्तम डान्सर सुद्धा आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुपूर शिखरेने मकरंद अनासपुरे यांच्या ‘ढिपाडी ढिपांग’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला आहे. परंतु, या मराठी गाण्यावर डान्स करताना नुपूरने चक्क विकी कौशलच्या व्हायरल ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप केली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर ‘तौबा तौबा’ गाणं चांगलंच चर्चेत आलं आहे.
हेही वाचा : मृणाली शिर्केने सोडली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका! मुक्ताची बहीण म्हणून झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, पाहा प्रोमो
नुपूर शिखरेचा जबरदस्त डान्स ( Nupur Shikhare )
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात ‘तौबा तौबा’ हे गाणं आहे. ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप जराशी कठीण आहे. त्यामुळे ही स्टेप नेमकी कशी करायची याचे विविध मजेशीर ट्रेनिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अगदी आमिर खानच्या जावयाला सुद्धा ही स्टेप करण्याचा मोह आवरलेला नाही.
नुपूर शिखरेने मराठमोळ्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत विकीच्या ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप केली आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्याच्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्चा वर्षाव केला आहे. मिथिला पालकर, प्राजक्ता कोळी या अभिनेत्रींनी या व्हिडीओवर कमेंट करत नुपूरला ‘बेस्ट’ म्हटलं आहे. तर, अन्य काही युजर्सनी “वाह नुपूर आम्हाला वाटलं नव्हतं तू हे गाणं व्हिडीओला जोडशील”, “अरे आम्हाला वाटलं तौबा तौबा गाणं आहे”, “कसं काय जमत रे तुला हे सगळं”, “लय भारी”, “नुपूरचं मराठी प्रेम” अशा प्रतिक्रिया त्याच्या ( Nupur Shikhare ) व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, नुपूर शिखरेबद्दल सांगायचं झालं, तर तो सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो. नुपूर अनेकवर्ष आमिर खान व सुष्मिता सेन यांचा पर्सनल ट्रेनर होता. याशिवाय नुपूर फिटनेस तज्ज्ञ व सल्लागार म्हणून देखील ओळखला जातो. २०२० मध्ये आयरा व नुपूरची भेट झाली होती. यावर्षी हे दोघंही लग्नबंधनात अडकले.