आमिर खानचा मुलगा अभिनेता जुनैद खानने २०२४ मध्ये ‘महाराज’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्याची आणि अभिनेत्री शर्वरी वाघची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. यशराज फिल्म्सच्या ‘महाराज’ या चित्रपटात झळकण्याआधी, जुनैद खानने त्याच्या वडिलांच्या आणि सावत्र आई किरण रावच्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते. जुनैदने त्याच्या वडिलांचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि सावत्र आई किरण रावचा ‘लापता लेडीज’ या दोन चित्रपटांसाठी ऑडिशन दिले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूट्यूबवरील विकी लालवानीच्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जुनैदने या अनुभवांबद्दल माहिती दिली. बजेटची मर्यादा आणि योग्य कास्टिंगसाठीचा शोध या गोष्टींनी या निर्णयांवर कसा परिणाम केला हे त्याने उलगडून सांगितले.

हेही वाचा…भारताचं दुसऱ्या गोल्डन ग्लोबचं स्वप्न भंगलं, ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ला मागे टाकत ‘या’ सिनेमाने पटकावला पुरस्कार

जुनैदने सांगितले की, त्याने आणि किरण रावने ‘लाल सिंग चड्ढा’साठी आई-मुलाच्या भूमिकेसाठी एकत्रित ऑडिशन दिले होते. तो म्हणाला, “मी तुम्हाला ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये दिसलो असतो, कारण मी आणि किरण रावने त्यासाठी चाचणी दिली होती. यात किरण माझी आई बनली होती. आम्ही चित्रपटासाठी सात-आठ दृश्ये चित्रीत केली, जवळपास २० मिनिटांचे फुटेज तयार झाले. ही माझ्यासाठीदेखील एक चाचणी होती. पप्पा मला मी चित्रपटाच्या प्रक्रियेशी कसे जुळवून घेतो हे पाहू इच्छित होते. पण, शेवटी मुख्यतः बजेटच्या कारणामुळे ते शक्य झाले नाही. नवीन व्यक्तीसाठी अशा महागड्या चित्रपटात काम करणे कठीण होते.” 

जरी त्याला भूमिका मिळाली नाही तरी या अनुभवामुळे जुनैदला त्याच्या वडिलांबरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली. आमिर खानने या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती. १९९४ च्या ‘फॉरेस्ट गंप’ या अमेरिकन सिनेमाचा हा भारतीय रिमेक होता.

हेही वाचा…९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

‘लाल सिंग चड्ढा’ व्यतिरिक्त जुनैदने किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठीदेखील ऑडिशन दिले होते. त्या अनुभवाबद्दल तो म्हणाला, “‘लापता लेडीज’चा अनुभव खूप वेगळा होता. मी त्यासाठी स्क्रीन टेस्ट दिली होती. पण, किरणने मला सांगितले की ‘या भूमिकेसाठी स्पर्श श्रीवास्तव जास्त योग्य आहे’ आणि मी तिच्याशी सहमत आहे. तो त्या भूमिकेसाठी अधिक चपखल होता.” 

या निर्णयामुळे त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम झाला नाही. याबाबत जुनैद म्हणाला, “आमचं नातं खूप चांगलं आहे. किरण खूप मजेशीर आणि प्रेमळ व्यक्ती आहे, आमचं खूप छान जमून येतं.” 

हेही वाचा…मुंबई : शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण; बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी

भारतीय ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीत घडणारा ‘लापता लेडीज’ हा एक व्यंगात्मक कॉमेडी-ड्रामा आहे. हा चित्रपट लग्नसोहळ्यात झालेल्या गोंधळावर आधारित आहे, जिथे दोन नवविवाहित वधू ट्रेन प्रवासादरम्यान अचानक गायब होतात. त्यानंतर त्यांच्या शोधासाठीची गमतीदार आणि गोंधळात टाकणारी कथा पुढे उलगडते.

हेही वाचा…शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

किरण रावने दिग्दर्शित केलेल्या आणि आमिर खान निर्मित या चित्रपटात स्पर्श श्रीवास्तवसह अनेक प्रतिभावान कलाकार झळकले आहेत. ‘लापता लेडीज’ला भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले होते, पण या चित्रपटाला ऑस्करमध्ये अंतिम नामांकनाच्या यादीत स्थान मिळाले नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan son junaid khan opens up of auditioning for kiran rao laapataa ladies film psg