आमिर खान मुलगी आयराच्या लग्नामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खान व त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान मराठमोळ्या नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. या लग्नात आमिर, त्याच्या दोन्ही पत्नी रीना व किरण राव, दोन्ही मुलं जुनैद व आझाद एकत्र आले होते. खान कुटुंबाने आयरा व नुपूरच्या लग्नात खूप धमाल केली.
आमिर व रीना यांना जुनैद व आयरा ही दोन अपत्ये आहेत. तर किरण राव व आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर दोन्ही पत्नींपासून विभक्त झाला आहे. मुलीच्या लग्नात आमिर खानबरोबर त्याचा मुलगा जुनैदही जबाबदाऱ्या पार पाडताना दिसला. लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओंमध्ये आमिर व जुनैद एकत्र पोज देताना दिसले. आमिरची मुलं इंडस्ट्रीपासून दूर असल्याने त्यांची फारशी चर्चा होत नाही. पण या लग्नातील फोटोंनंतर जुनैद मात्र चांगलाच चर्चेत आला आहे.
आमिर खान व रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद काय करतो, याबद्दलही लोकांना माहीत नाही. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. जुनैदचा जन्म १९९३ साली झाला होता. तो ३० वर्षांचा आहे. जुनैद लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पदार्पणासाठी त्याने वडील आमिर खानची मदत घेतली नाही. याबद्दल आमिर खाननेच माहिती दिली होती. जुनैदला पहिला चित्रपट मिळण्यापूर्वी १५ वेळा नकार मिळाला होता, असं त्याने सांगितलं होतं.
आमिरचा मुलगा जुनैदने २०१८ मध्ये थिएटरपासून सुरुवात केली. अभिनयाचे बारकावे शिकून अनेक चढउतारांनंतर जुनैद खान आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या ‘महाराजा’मधून तो निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. याशिवाय तो आणखी एका चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्या विरुद्ध साई पल्लवी आहे.
जुनैदचं राहणीमान खूप साधं आहे. तो लक्झरी गाड्या आणि विमानाने प्रवास करणं टाळतो, याबाबत आमिरनेच सांगितलं होतं. तो रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतो. तसेच दैनंदिन जीवनातही सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करतो, असं आमिरने सांगितलं होतं. आता जुनैद लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.